शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (15:28 IST)

मायक्रोसॉफ्टचे आयआयटींना सर्वाधिक पॅकेज

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल कंपनी मायक्रोसॉफ्टने 'कॅम्पस प्लेसमेंट'च्या पहिल्याच दिवशी या क्षेत्रातील सर्वाधिक पॅकेज देऊ केले आहे. त्यामुळे सर्वाधिक पॅकेज देण्याचे हे सलग दुसरे वर्ष ठरले आहे. विद्यार्थ्यांची निवड कंपनीने आपल्या अमेरिकेतील मुख्यालयासाठी केली आहे. मायक्रोसॉफ्टने आयआयटीमधील विद्यार्थ्यांना सरासरी 2.14 लाख डॉलरचे पॅकेज देऊ केले आहे. सध्या देण्यात आलेली ऑफर गेल्यावर्षी प्रमाणेच आहे.
 
मात्र, यंदा रुपयाच्या घसरणीमुळे देण्यात आलेले पॅकेज वाढून 1.5 कोटी रुपयांवर गेले आहे. 2017 मध्ये मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आलेले पॅकेज 1.39 कोटी रुपयांचे होते. एका समिती सदस्याने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांचा नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मायक्रोसॉफ्टमध्येच काम करण्यास पसंती दाखवली आहे.
 
आयआयटी पवईमध्ये (मुंबई) उबर इंटरनॅशनल, रुबरिक आणि कोहेसिटी नामक कंपन्यांनी यंदा प्रथमच भरती केली. या कंपन्यांनी अमेरिकेतील आपल्या कार्यालयांसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड केली आहे. आयआयटी पवईमध्ये देशांतर्गत नोकरीसाठी ब्लॅकस्टोन नामक कंपनीने वार्षिक 45 लाख रुपयांचे पॅकेज देऊ केले आहे. आयआयटीच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार यंदा वार्षिक 25 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक वेतन देणार्‍या कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
 
आयआयटी खरगपूरमध्ये पहिल्याच दिवशी बाराजणांना आंतरराष्ट्रीय नोकर्‍या ऑफर करण्यात आल्या. सर्वाधिक ऑफर जपानच्या कंपन्यांनी दिल्या आहेत. मायक्रोसॉफ्टनेही येथे चार विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
 
आयआयटी मद्रासमध्ये पहिल्याच दिवशी मायक्रोसॉफ्ट, गुगल, अ‍ॅपल, एअरबस आणि मॅकिंझी या कंपन्यांनी विद्यार्थ्यांची निवड केली. अ‍ॅपलने आठ विद्यार्थ्यांची निवड केली. आयआयटी दिल्लीमध्ये उबर आणि मायक्रोसॉफ्टने विद्यार्थ्यांची निवड केली.