शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

100 कोटींची संपत्ती, दाम्पत्य घेणार संन्यास

मध्य प्रदेशातील नीमचमध्ये राहणार्‍या एका दाम्प्त्याने आपल्या 100 कोटींच्या संपत्तीचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. याची चर्चा देशभर सुरू आहे. संपत्तीबरोबर आपल्या तीन महिन्यांच्या मुलीलादेखील ते सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
 
अनामिका आणि सुमित राठोड असे या दाम्पत्याचे नाव असून, पुढील आठवड्यात ते सूरतमध्ये दीक्षा घेणार आहेत. राठोड कुटुंब हे नीमचमधल्या सघन कुटुंबापैकी एक आहे. सुमित स्वत: नीमचमधले प्रतिष्ठित व्यावसायिक असल्याची माहिती नेटवर्क 18 ने दिली आहे. विशेष म्हणजे सुमितने लंडनमधल्या प्रसिद्ध विद्यापीठात आपले शिक्षण पूर्ण केल्याचेही समजते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमितने आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळायला सुरूवात केली. फॅक्टरीसोबत त्यांच्या नावावर कोट्यावधीची मालमत्तादेखील आहे. तर त्यांची पत्नी अनामिका ही इंजिनिअर आहे. लग्नापूर्वी एका बड्या कंपनीत त्या काम करत होत्या. त्या अभ्यासातही हुशार असून दहावी आणि बारावीमध्ये राजस्थान बोर्डातून पहिल्या आल्या होत्या.
 
काही वर्षांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. अनामिका आणि सुमित या दोघांनाही तीन वर्षांची मुलगी आहे. पण संपत्तीचा त्याग करून आणि आपल्या गोंडस मुलीलाही सोडून त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय पक्का केला आहे. या दोघांच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. एवढ्या छोट्या मुलीला सोडून कोणी संन्यास कसा घेऊ शकतो? यावर एकदा विचार करावा, असेही सल्ले त्यांना दिले.