रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (10:42 IST)

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने सोमवार, 16 जानेवारीला पाकिस्तानी कट्टरतावादी अब्दुल रहमान मक्कीला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केलं आहे. या निर्णय सुरक्षा परिषदेच्या दाएश आणि अल-कायदा प्रतिबंध समितीने घेतला आहे. अब्दुल रहमान मक्की लष्कर-ए-तोयबाचा कट्टरतावादी आहे. गेल्या वर्षी भारताने मक्कीला ‘दहशतवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मांडला होता. पण चीनने हा प्रस्ताव थांबवला होता. यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती.
 
अब्दुल रहमान मक्की जमात-उद-दावाचा मुख्य हाफिज सईदचा नातेवाईक आहे. हाफिज सईद मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यांचा मास्टर माईंड समजला जातो.
संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या पत्रकानुसार 16 जानेवारी 2023 पासून सुरक्षा परिषदेची आयएसआयएल (दाएश) आणि अल-कायदा प्रतिबंधक समितीने जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत अब्दुल रहमान मक्की याचं नाव घातलं आहे.
 
यामुळे जगभरात मक्कीची संपत्ती गोठवता येईल आणि त्याला मक्केसह अनेक ठिकाणी प्रवास करण्यास प्रतिबंधित केलं जाईल.
 
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार भारत आणि अमेरिका या देशांनी आधीच आपआपल्या देशात अब्दुल रहमान मक्कीला ‘दहशतवादी’ घोषित केलेलं आहे.
 
मक्कीवर तरुणांची माथी भडकवण्याचे, भारतावर हल्ला करण्याची योजना बनवण्याचे, तसंच बेहिशोबी पैसे जमा करण्याचे आरोप आहेत.
 
26/11 च्या मुंबई हल्लयात काय घडलं होतं?
लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता.सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले. 26 नोव्हेंबर 2008 च्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली.
 
हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं. हा हल्ला इतका मोठा असेल याचा कोणालाही अंदाज आला नव्हता. पण हळूहळू परिस्थिती चिघळत गेली आणि त्याच्या गांभीर्याचा अंदाज येऊ लागला.
 
26 नोव्हेंबरच्या त्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.
लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन संपलं.
 
या दरम्यान 160 हून जास्त लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. तर सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी 60 तासांहून अधिक वेळ लागला.
 
Published By - Priya Dixit