शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (22:55 IST)

नरिमन पॉईंट –दिल्ली अवघ्या १२ तासांत प्रवास

nitin gadkari
दिल्ली – मुंबई दरम्यान नवीन द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले असून हा महामार्ग मुंबईतील नरिमन पॉईंटशीही जोडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मुंबईत वीजेवर धावणाऱ्या दुमजली वातानुकूलित बसला गुरुवारी हिरवा कंदिल दाखविण्यात आला. यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी दिल्ली-मुंबई महामार्गाची माहिती दिली.
 
या महामार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून या महामार्गावरून वीजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बस चालवण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले. महामार्गाच्या कामाला गती देण्यात येत आहे. सध्या मुंबई-दिल्ली रस्ते मार्गे वाहनानांना १ हजार ४५० किलोमीटर अंतर पार करावे लागते. यासाठी २४ तास लागतो. महामार्ग झाल्यास हा प्रवास बारा तासांत होईल, असे गडकरी यांनी सांगितले. हा महामार्ग नरिमन पाॅईंटशी जोडण्याचे नियोजन असून त्यामुळे येथूनही रस्तेमार्गे दिल्लीला बारा तासांत जाता येणे शक्य होईल. गेल्या काही वर्षांत वांद्रे-वरळी सी लिंक, ५५ उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे महामार्ग अशी अनेक कामे केली. मुंबई-दिल्ली महामार्ग नरिमन पाॅईंट, तसेच वांद्रे-वरळी सागरीसेतूला जोडण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. दिल्ली-चंढीगड, दिल्ली-डेहरादून, दिल्ली-हरिद्वार आदी मार्गांचे काम सुरू असून त्यामुळे या शहरांमधील प्रवास दोन तासांत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.