तब्बल ४७ दिवसांचा पायी प्रवास करून निवृतीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमध्ये आगमन; टाळ मृदुगांचा गजर
पांडूरंगाच्या भेटीने कृतार्थ होऊन श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज त्र्यंबकेश्वर मध्ये आगमन झाले. हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दणाणुन गेला होता. आषाढी एकादशीच्या पंढरपुर वारीसाठी जेष्ठ पौर्णिमेच्या एक दिवस आधी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते. आषाढी एकादशीला पांडूरंगाचे दर्शन व द्वादशीला उपवास सोडून पालखी पुन्हा परतीच्या मार्गाला निघाली. एकंदरीत ४७ दिवसांचा पायी प्रवास करून आज सकाळी १२ वाजता पालखी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाली.
तुपादेवी फाट्याजवळ धर्मादाय सहआयुक्त टी एस अकाली, सहाय्यक धर्मादाय आयुक्त राम लिप्ते, अॅडवोकेट भाऊसाहेब गंभीरे, पोलीस निरीक्षक संधी रणदिवे यांनी पालखीचे स्वागत केले. पालखी सोहळ्याचे मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे यावेळी उपस्थित होते. पालखीचे स्वागतासाठी त्रंबकेश्वर मधील भाविक तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्र्यंबकेश्वरी प्रदक्षिणेसाठी येतांना निवृत्तीनाथांसह भावडांनी याठिकाणी विसावा घेतला, त्यामुळे येथील स्मृती मंदीरातील समाधीवर नाथांची प्रतिमा ठेऊन अभंग गायन व आरती करण्यात आली. यानंतर श्री संत गजानन महाराज संस्थान समोर ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.
तालविकास पखवाज गुरुकुल, विकास महाराज बेलुकर, कैलास महाराज तांबे, यांचेसह असंख्य बाल वारकरी पालखी सोहळयात सामील झाले होते. नंदकुमार मोरे यांनी मोफत बॅण्डसेवा दिली. यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर रथ आल्यावर नाथांची प्रतिमा डोक्यावर घेऊन मंदिरात नेण्यात आली. येथे भगवान त्र्यंबकेश्वराची आणी शिवस्वरुप निवृत्तीनाथांची गर्भगृहात भेट घडविण्यात आली. सभामंडपात नाथांची प्रतिमा कासवावर ठेऊन टाळमृदुंगाच्या गजरात अभंग गायन करण्यात आले. यानंतर मेनरोड मार्गे पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. येथे नाथांच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. कुशावर्ताला वंदन करून रथ निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आला. गावामध्ये पालखी मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी सुवासिनिंनी निवृत्तीनाथांच्या पादुकांना औक्षण केले.