शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (22:36 IST)

नवाब मलिकांचा भाजप नेत्यांना इशारा; म्हणाले –‘होय, मी भंगारवाला, भंगारांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही’

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी तपासाधिकारी म्हणजेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे  यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. त्यानंतर मलिकांनी आता भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरेल. अनेक बड्या लोकांची नावं समोर येतील. अधिवेशनानंतर त्यांना तोंड लपवायला जागा मिळणार नाही, असा सुचक इशारा नवाब मलिकांनी दिला आहे.
 
नुकतंच भाजप नेते मोहित कंबोज  यांनी मंत्री नवाब मलिक (यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. या विषयावरून मलिकांना सवाल करण्यात आला. त्यावेळी मलिक म्हणाले की, 100 कोटींची माझी पात्रता तरी आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझी सर्व संपत्ती विकली तरी 100 कोटी मिळणार नाहीत. माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे. माझं कुटुंब आजही भंगाराचा व्यवसाय आहे. तुम्ही आजही तिथे जाऊ शकता. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, पुढे मलिक म्हणाले, माझ्यावर कधी सोने तस्करीचे आरोप झाले नाहीत.मुख्यमंत्री निधीत जमा केलेला माझा चेक कधी बाऊन्स झाला नाही. माझ्या घरावर कधी सीबीआयचे छापे पडले नाहीत.कोणत्याही बँकेच्या पैशांवर मी कधीच डल्ला मारला नाही, असं म्हणत मलिक यांनी कंबोज यांच्यावर हल्ला चढवला.तसेच, होय, मी भंगारवाला आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. या लोकांना भंगारवाल्याची किमया अजून माहीत नाही.
भंगारवाला निरुपयोगी गोष्टी जमा करतो. भंगाराचे तुकडे करतो आणि मग ते भट्टीत टाकून त्याचं पाणी पाणी करतो.या शहरात असलेल्या सगळ्या भंगारांचे तुकडे तुकडे करून भट्टीत टाकून त्यांचं पाणी पाणी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं मलिक म्हणाले.