रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (15:07 IST)

तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार, पवार यांची घोषणा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. या तिन्ही राज्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि छोट्या मोठ्या पक्षांना बरोबर घेऊन आघाडी करून लढणार असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी  केली. विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये सत्तापरिवर्तन होईल, असा विश्वासही पवार यांनी केला.
 
मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. त्यामुळे यावेळी पाच जागा राष्ट्रवादी लढणार आहे. गोव्यामध्ये काँग्रेस, तृणमूल आणि इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. तर पुढच्या आठवड्यात आपण स्वतः उत्तर प्रदेशात जाणार असून तेथे समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या – मोठ्या पक्षांशी आघाडी झाली आहे. यासंदर्भात आज, बुधवारी लखनऊमध्ये आघाडीतील पक्षांची बैठक होणार असून या बैठकीत जागावाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
 
आमच्या बाजूने ८० टक्के लोक आहेत तर २० टक्के लोक नाहीत, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. या विधानाचा पवार यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री हा सर्वांचा असतो. २० टक्के लोक बाजूने नाहीत हे विधान अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवणारे आहे. अशाप्रकारचे विधान मुख्यमंत्रीपदाला शोभा देणारे नाही. पण त्यांच्या जे मनात आहे, ते त्यांच्या ओठावर आले आहे. यातून एक गोष्ट सिद्ध होते की, देशात एकता आणि सहिष्णुता टिकवायची असेल तर अशाप्रकारचे सांप्रदायिक विचार वाढणे योग्य नाही. याविरोधात उत्तर प्रदेशची जनता नक्कीच कौल देईल आणि राज्यात परिवर्तन घडवेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.