नेपालमध्ये नकाशा दाखविण्याचा प्रस्ताव अखेर मागे
नेपाळने भारताचा काही भाग नकाशावर दाखविण्याचा प्रस्ताव मागे घेतला आहे. भारताचा काही भूभाग नवीन नकाशावर दाखवल्यानंतर नेपाळने राजकीय संबंधांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक पाऊल मागे घेतलं आहे. नेपाळने जाहीर केलेला नवीन नकाशा देशाच्या घटनेत जोडण्यासाठी घटना दुरुस्तीचा प्रस्ताव संसदेत मांडायचा होता. परंतु अचानक नेपाळ सरकारने घटना दुरुस्तीची कार्यवाही संसदेच्या अजेंड्यातून काढून टाकली.
घटनादुरुस्ती विधेयक नेपाळमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांच्या परस्पर संमतीने संसदेच्या अजेंड्यातून काढून टाकलं गेलं आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मंगळवारी नव्या नकाशाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय एकमत होण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी भारताशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याची सूचना केली होती. भारताशी द्विपक्षीय संवादाचे वातावरण निर्माण करण्यासाठी नेपाळने आपल्या वतीने हे पाऊल उचलले आहे.