शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (22:31 IST)

एनआयएः सचिन वाझेंनी मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं का ठेवली?

मुंबई पोलीस दलात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क केली, असा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सचिन वाझेंच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात केलाय.
अँटिलिया स्फोटकं प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह 10 आरोपींविरोधात NIA ने आरोपपत्र दाखल केलंय.
स्पेशल कोर्टात दाखल 10,000 पानी आरोपपत्रात, NIA ने मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचा कट सचिन वाझेंनी का रचला? आणि मनसुख हिरेनची हत्या का करण्यात आली? याची सविस्तर माहिती दिली आहे.
मुकेश अंबानी यांच्याकडून वसूली करायची होती?
अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचा कट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सचिन वाझेंना मे महिन्यात अटक केली होती.
सचिन वाझेंनी उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं का ठेवली? त्यांचा हेतू नक्की काय होता? याची माहिती चौकशीदरम्यान बाहेर आली नव्हती. आता, कोर्टात दाखल आरोपपत्रात पहिल्यांदाच राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझेंच्या हेतूचा खुलाला केलाय.
एनआयएने आरोपपत्रात दावा केलाय की, 'मुकेश अंबानी यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा वाझेंचा हेतू होता. जेणेकरून त्यांना या कटातून मोठा आर्थिक फायदा होईल. तसेच अंबानी कुटुंबाला मृत्यूची भीती दाखवून दहशतवादी कृत्य केलं.'
राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझेंना अटक केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाझेंनी पार्क केली स्फोटकांची गाडी?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला एक हिरव्या रंगाची स्कॉर्पियो गाडी आढळली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात गाडीत जिलेटीनच्या 20 कांड्या आणि धमकीचं एक पत्र असल्याचं आढळलं होतं.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या गाडीत स्फोटकं मिळाल्याने खळबळ उडाली. त्याबरोबर क्राइमब्रांच, एटीएस आणि एनआयएने चौकशी सुरू केली.
ही गाडी ठाण्यातील एक व्यपारी मनसुख हिरेन वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हिरेन यांना चौकशीसाठी बोलावलं. दरम्यान, स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास क्राइम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख सचिन वाझे यांना देण्यात आला.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या आरोपपत्रात ही स्कॉर्पियो गाडी अंबानी यांच्या घरापर्यंत कशी पोहोचली याची माहिती दिलीये.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार,
सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला पूर्वीपासून ओळखत होते.
त्यांनी हिरेन यांना स्कॉर्पियो गाडी विक्रोळीत पार्क करण्यास सांगितलं. गाडीची किल्ली पोलीस मुख्यालयाजवळ येऊन दे, असंही सांगितलं होतं
वाझेंनी गाडी आपल्या घरासमोर पार्क केली. गाडीची नंबरप्लेट बदलण्यात आली. निता अंबानींच्या सुरक्षा ताफ्यामधील एका गाडीचा नंबर यासाठी वापरण्यात आला होता. जेणेकरून अंबानी यांना थेट धमकावता येईल.
मनसुख हिरेन यांनी गाडी हरवल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली होती. पण, ही गाडी वाझे यांनी नेल्याचं चौकशीत पुढे आल्याचं एनआयएचं म्हणणं आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार,
सचिव वाझे यांनी अँटिलियाबाहेर गाडीत स्फोटकं ठेवली
धमकी देणारं एक पत्र ठेवण्यात आलं
वाझेंनी स्वत: स्कॉर्पियो गाडी चालवत नेऊन अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केली
तर, ड्रायव्हरला हे एक रिक्रेट ऑपरेशन चालू असल्याचं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी गाडी बेवारस अवस्थेत मिळाल्यानंतर सर्वात आधी वाझे घटनास्थळी पोहोचले आणि तपासाची दिशा वळवण्यात यशस्वी झाले, असं एनआयएने आरोपपत्रात नमूद केलंय.
सचिन वाझेंना अटक केल्यानंतर एनआयएने त्यांना अंबानी यांच्या घराबाहेर चालवून पाहिलं होतं. गाडी पार्क करणारे वाझेच असल्याचा एनआयएला संशय होता.
दरम्यान, जैश-उल-हिंद नावाच्या एका टेलिग्राम चॅनलने अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याची जबाबदारी घेतल्याची माहिती समोर आली. पण, यातून वाझेंचा मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्याचा प्लान होता असं राष्ट्रीय तपास यंत्रणेचं म्हणणं आहे.
मनसुख हिरेनवर गुन्हा कबूल करण्यासाठी दवाब?
मनसुख हिरेनला मी ओळखत नाही, असा दावा सचिन वाझे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वारंवार केला होता. पण, एनआयच्या आरोपपत्रानुसार सचिन वाझे आणि मनसुख हिरेन एकमेकांना ओळखत होते.
एनआयएच्या आरोपपत्रानुसार
सचिन वाझेंनी मनसुख हिरेनवर गुन्ह्याची जबाबदारी घेण्यासाठी दवाब टाकला.
काही दिवसातच जामीन मिळवून देतो असंही त्यांनी हिरेन यांना सांगितलं होतं.
आरोपपत्रात पुढे दावा करण्यात आला आहे की, मनसुख हिरेन यांनी हे मानण्यास नकार दिला.
मनसुख हिरेन यांची हत्या का केली?
राज्याचं विधानसभा सत्र सुरू असतानाच मार्च महिन्यात मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा परिसरातील खाडीत आढळून आला. मनसुख यांची हत्या झाली? नक्की काय झालं? कोणालाच कल्पना नव्हती.
हिरेन यांची हत्या झाल्याचं संशय व्यक्त करत विरोधकांनी उपस्थित करून सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर एटीएसने चौकशी सुरू केली. हिरेन यांच्या हत्येचा आरोप कुटुंबीयांनी सचिन वाझेंवर केला होता.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आरोपपत्रानुसार
मनसुख हिरेन या कटाची विक लिंक आहेत आणि तपास अधिकाऱ्यांसमोर सर्व माहिती देतील याची वाझेंना भीती होती.
वाझेंनी प्रदीप शर्मांसोबत मनसुखला मारण्याचा कट रचला.
मनसुखला मारण्याचा कट 2 मार्चला रचण्यात आला. या मिटिंगमध्ये सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि सुनिल माने उपस्थित होते .
प्रदीप शर्मा यांनी संतोश शेलारला हिरेन यांच्या हत्येची सुपारी दिली.
सुरक्षित स्थळी नेतो म्हणून मनसुख यांना बोलावण्यात आलं
एनआयएच्या आरोपपत्रात करण्यात आलेल्या दाव्यानुसार,
सचिन वाझेंनी मनसुख हिरेन यांना सुरक्षितस्थळी ठेवतो असं सांगून बोलावलं.
मुंबई पोलिसांचे बडतर्फ अधिकारी आणि अटक आरोपी सुनिल माने यांनी नाव बदलून मनसुख यांना फोन केला.
सुनिल माने यांनी हिरेन यांना सोबत घेतलं आणि सुरक्षितस्थळी नेतो असं आश्वासन देऊन इतर आरोपींच्या हवाले केलं.
गाडीत करण्यात आली मनसुख हिरेन यांची हत्या
मनसुख यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना, हिरेन पोलीस अधिकाऱ्याने भेटायला बोलावलं आहे असं सांगून बाहेर पडल्याची माहिती दिली होती. पण, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मनसुख हिरेन यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली.
दरम्यान, पाच मार्चला सकाळी मुंब्राच्या खाडीत पोलिसांना एक अज्ञात मृतदेह आढळून आला. तपास सुरू झाला तर, हा मृतदेह मनसुख हिरेन यांचा असल्याची ओळख पटली.
एनआयएच्या आरोपपत्रानुसार,
• बडतर्फ पोलीस अधिकारी सुनिल मानेंनी मनसुख यांना संतोष शेलार, आनंद जाधव आणि सतीश मोथकुरी यांच्या हवाले केलं
• या तिघांनी गाडीतच मुनसुख हिरेन यांची हत्या केली.
• त्यानंतर ठाण्यातील कशेळी ब्रीजवरून हिरेन यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आला
• चौकशीत समोर आलंय की प्रदीप शर्मा यांनी मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी संतोश शेलारला मोठी रक्कम दिली
राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझे, सुनिल माने, प्रदीप शर्मा, संतोष शेलार, आनंद जाधव, मनीष सोनी आणि सतीश मोथकुरी यांच्याविरोधात Unlawful Activities Prevention Act आणि इतर आरोपांतर्गत आरोपपत्र दाखल केलंय.