रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (10:25 IST)

मोदींचा निरोप घेऊन गडकरी मातोश्रीवर

भाजपकडून विरोधकांना 'जशास तसे' उत्तर देण्याची रणनीती आखली जात असून त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा विरोध आधी शांत करण्याचे ठरवले आहे. मोदींनी शिवसेनेची समजूत काढण्याची जबाबदारी ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 
विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून संसदेत हल्ला सुरू केला असताना मित्रपक्ष असलेली शिवसेनाही नोटाबंदीच्या निर्णयानंतर दंड थोपटून पंतप्रधानांवर टीका करू लागली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले चार दिवस विरोधकांच्या गोंधळामुळे वाया गेले आहेत.
 
गडकरी सुमारे तासभर मातोश्री निवासस्थानी होते. तिथून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी उद्धवभेटीचे कारण विचारले असता मी मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो होतो, असे त्यांनी सांगितले. या भेटीत कोणती राजकीय चर्चा झाली का?, अशी विचारणा केली असता कोणताही राजकीय विषय चर्चेत नव्हता, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.