गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ओडिशाच्या बेटावरून भारताचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-5चे यशस्वी परीक्षण

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या आणि आवाजाच्या वेगापेक्षा 24 पटीने वेगाने जाणाऱ्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची पाचवी चाचणी यशस्वी झाली आहे. 5 हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य भेदू शकणाऱ्या या शक्तिशाली क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानसोबतच चीनही भारताच्या टप्प्यात आला आहे.
 
ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून आज सकाळी अग्नि-5 झेपावलं. डीआरडीओनं विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राची चौथी चाचणी डिसेंबर 2016 मध्ये झाली होती. तीही यशस्वी ठरली होती आणि ही शेवटची चाचणी असल्याचंही सांगण्यात आलं होतं. परंतु, आज वर्षभरानंतर या क्षेपणास्त्राची पुन्हा चाचणी घेण्यात आली आणि त्यातही या क्षेपणास्त्राने जवळपास सर्व निकष पूर्ण केले.  अग्नि-5 क्षेपणास्त्र 17 मीटर उंच असून त्याचं वजन 50 टन आहे. हे क्षेपणास्त्र दीड टन वजनापर्यंतची अण्वस्त्रं वाहून नेऊ शकते. 5000 ते 5,500 किमीपर्यंत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रं इंटरकॉन्टिनेन्टल बॅलास्टिक मिसाइल (ICBM) म्हणून ओळखली जातात. सध्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनकडेच अशी क्षेपणास्त्र आहेत.