सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 जून 2023 (11:16 IST)

Odisha Accident: 2 बसची समोरासमोर धडक 12 ठार, 7 जखमी

accident
ओडिशातील गंजम जिल्ह्यात काल रात्री बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना बेरहामपूरच्या एमकेसीजी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी रात्री उशिरा दिगापहांडी पोलिस हद्दीत ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (OSRTC) बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसला धडक दिली.

बेहरामपूर-तप्तपाणी मार्गावरील दिगपहांडी परिसराजवळ रविवारी रात्री उशिरा लग्नाच्या मिरवणुकीत निघालेल्या बसची दुसऱ्या बसलासमोरून  धडक बसल्याने हा अपघात झाला. बेहरामपूर येथे एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहून ते दिगपहांडीजवळील खंडादेउली येथे परतत होते, तर ओएसआरटीसीची बस रायगडाहून भुवनेश्वरला जात होती. अपघातामागचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
 
गंजमचे डीएम दिव्या ज्योती परिदा यांनी सांगितले की, दोन बसमध्ये समोरासमोर धडक  झाली. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बस अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
 
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना तीन -तीन लाख रुपये देण्याचे जाहीर केले. जखमींना मोफत वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश दिले आहेत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्री विक्रम अरुख आणि गंजम डीपीसीसीचे अध्यक्ष आणि आमदार विक्रम पांडा यांना तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पीडितांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
या अपघातात 12 जणांना जीव गमवावा लागला, त्यापैकी सात जण एकाच कुटुंबातील होते आणि बाकीचे त्यांचे नातेवाईक होते. सर्वजण खासगी बसमध्ये चढले होते. OSRTC बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, विशेष मदत आयोगाने जखमींच्या उपचारासाठी प्रत्येकी 30 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस घेत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit