गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ओडिशा अपघात : "आई-वडिलांचा जीव गेला होता, रडता रडता त्यांचं चिमुकलाही गेला..." - प्रत्यक्षदर्शी

- सुब्रत कुमार पति
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात घडलेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 261 वर पोहोचली आहे.
 
शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी 7 वाजता हा अपघात झाला. त्यानंतर बचावकार्य वेगाने सुरू झालं.
 
स्थानिक लोकांनी बचावकार्यासाठी मोठी मदत केल्याचं दिसून आलं. घटनास्थळी पोहोचल्यावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बचावकार्यात मदत करणाऱ्या स्थानिकांचं कौतुकही केलं.
 
नवीन पटनायक म्हणाले की, स्थानिक लोकांच्या मदतीने काल रात्री मलब्यातून लोकांना बाहेर काढायचं काम सुरू झालं होतं.
 
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
टूटू विश्वास या प्रत्यक्षदर्शीनं दुर्घटनेनंतर परिस्थितीचं वर्णन केलं. ते म्हणाले की, "जेव्हा ही घटना घडली तेव्हा घटनास्थळाच्या जवळ असलेल्या माझ्या घरी मी होतो. आम्हाला जोरात आवाज आला. आम्ही जेव्हा घरातून बाहेर आलो, तेव्हा ही दुर्घटना झाल्याचं कळलं. मालगाडीच्या वर रेल्वे चढली होती.
 
“जेव्हा मी तिथे पोहोचलो, तेव्हा मी पाहिलं की अनेक लोक जखमी झाले आहेत. अनेकांचा मृत्यू झाला होता. एक छोटा मुलगा तिथे रडत होता. त्याचे आई-वडील गेले होते. रडता रडता तो मुलगाही गेला.”
 
टूटू पुढे सांगतात की, “अनेक लोक तिथे पाणी मागत होते. मी जितकं शक्य आहे तितक्या लोकांना पाणी मागितलं. आमच्या गावातले लोक पीडितांची मदत करत होते. घटनास्थळावर अनेक लोक जखमी होते आणि ट्रेनच्या बाहेर निघत होते.”
 
ते पुढे म्हणाले की, “काही जखमी लोकांना आम्ही बस स्टॉपवर घेऊन गेलो, तेव्हा ते आमचे आभार मानू लागले. काल जे दृश्य पाहिलं त्यानंतर माझा मेंदू बधीर झालाय. माझ्या संपूर्ण शरीरावर रक्त सांडलं होतं.”
 
गिरिजाशंकर रथ नामक प्रत्यक्षदर्शी म्हणतात की, “संध्याकाळी ही घटना झाली तेव्हा एक ट्रेन अप होऊन येत होती. दुसरी डाऊनहून जात होती. तेव्हाच एक मालगाडी रुळावर उभी होती. कोरोमंडल एक्सप्रेस ट्रॅकवरून घसरली आणि मालगाडीला धडकली आणि एकच खळबळ उडाली.”
 
“दुसऱ्या बाजूने शालीमार एक्सप्रेस येत होती. ती मागून धडकली. तिचे दोन डबे रुळावरून घसरले. चहुबाजुला अफरातफरीचं वातावरण तयार झालं. आम्ही धावत पोहोचलो आणि लोकांची मदत करायला सुरुवात केली. आम्ही लोकांना डब्यातून बाहेर येण्यास मदत केली. हे काम रात्रभर सुरू राहिलं.
 
जखमींनी काय सांगितलं?
हावड्याहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये बसलेल्या मुकेश पांडे यांनी घटनेबाबत अधिक माहिती दिली.
 
हॉस्पिटलमध्ये जखम अवस्थेत असलेल्या मुकेश पांडेंनी सांगितलं की, त्यांनी जोरदार झटका बसला आणि ट्रेन रुळावरून घसरून उलटली.
 
ते म्हणाले. “अर्ध्या पाऊण तासानंतर मी जेव्हा ट्रेनच्या बाहेर निघालो तेव्हा मी अचंबित झालो. माझं सगळं सामान हरवलं. जे लोक गंभीर अवस्थेत होते त्यांना पहिल्यांदा नेण्यात आलं.”
 
“अनेक लोक मारले गेले पण मी कोणाला ओळखत नाही.”
 
बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातले सनी कुमारही कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये बसले होते. ते सांगतात की या घटनेनंतर ते बेशुद्ध झाले. अर्ध्या तासानंतर त्यांना प्रायव्हेट टेंपोने रुग्णालयात नेण्यात आलं.
 
रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत काय सांगितलं?
“बालासोर सरु आणि बाहागर बाजारात नुकसानभरपाई देण्यासाठी तीन काऊंटर्स तयार करण्यात आले आहेत. इथून लोकांना नुकसानभरपाई दिली जात आहे.”
 
“जी चौकशी समिती तयार केली त्याचे प्रमुख दक्षिण पूर्व रेल्वेचे सुरक्षा आयुक्त आहेत. त्यांची टीम कोणत्याही क्षणी पोहोचेल.” असं रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
 
जे लोक सुरक्षित आहे त्यांना गंतव्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या गाड्या चालवण्यात येत आहेत. एक ट्रेन हावडाच्या दिशेने गेली आहे. त्यात 1000 लोक आहेत. दुसऱ्यात 200 लोक आहेत. आणखी एक ट्रेन चेन्नईला गेले त्यात 250 लोक आहेत. असंही पुढे ते म्हणाले.