शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (12:06 IST)

संसद विशेष अधिवेशन : पहिल्याच मिनिटाला ‘हे’ घडलं आणि विरोधकांनी घातला एकच गोंधळ

संसदेचे 5 दिवसीय विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. ते शुक्रवार म्हणजे 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या G20 बैठकीतील यशाबद्दल आभार प्रस्ताव मांडला.
 
या बैठकी दरम्यान दिल्लीत महात्मा गांधी यांच्या समाधीला जागतिक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली ते दृष्य डोळ्यांना दिपवणारं होतं, असंही बिर्ला यांनी म्हटलं तेव्हा खासदारांनी टेबल वाजवून अनुमोदन दिलं.
 
दरम्यान लोकसभेत राष्ट्रगीत दोनदा वाजलं म्हणून विरोधकांचा पहिल्याच मिनिटाला गदारोळ घातला. पण ओम बिर्ला यांनी ते तांत्रिक कारणांमुळे झालं असावं, असं म्हणत विरोधकांना शांत बसायला सांगितलं.
 
संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी नरेंद्र मोदी यांनी निवेदन केलं.
 
विशेष अधिवेशनाचे दिवस जरी कमी असले तरी या वेळेचा पुरेपूर वापर करू, असं मोदी यांनी विरोधकांना आवाहन केलं आहे.
 
मोदी म्हणाले "भारताचं चंद्रयान मिशनचं यश, G20ची सफलता आणि विश्वकर्मा योजनेची सुरुवात या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन होतंय. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. यावेळी अधिवेशनाचे दिवस कमी असले तरी सगळ्यांनी यातील जास्तीत जास्त काळाचा उपयोग करू. रडगाणं बाजूला ठेवू. जुने वाद सोडून चांगल्या गोष्टी सोबत घेऊ आणि नवीन संसदेत प्रवेश करू."
 
गणेश चतुर्थीच्या दिवशी हा प्रवेश होतोय. गणपती हे विघ्नहर्त्याचं प्रतीक आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही विघ्ने येणार नाहीत अशी आशा करुया, असंही त्यांनी म्हटलं.
 
‘संसदेचं विशेष अधिवेशन अल्पकाळ आहे पण यावेळी संसदेच्या नवीन इमारतीमध्ये ऐतिहासिक निर्णय होतील, असेही संकेत नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
 
विशेष अधिवेशनात काय होणार?
केंद्र सरकारने संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासावर चर्चा करून हे विशेष अधिवेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संसदेच्या जुन्या इमारतीत होणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी सांगितलं.
 
“पहिल्या संसदेचा 75 वर्षांचा प्रवास आणि त्याची उपलब्धी यावर चर्चा होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनात फोटो सेशन होईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता सेंट्रल हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल,” असं जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
19 सप्टेंबरपासून नवीन संसद भवनात पहिलं अधिवेशन सुरू होईल. तर 20 सप्टेंबरपासून सामान्य सरकारी कामकाज सुरू होईल.
 
नवीन संसदेचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पण पावसाळी अधिवेशन जुन्या संसदेच्या इमारतीतच झाले. 970 कोटी रुपये खर्चून नवीन संसद इमारत बांधण्यात आली आहे. यालाच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प म्हटलं जातं.
 
कोणत्या विधेयकांवर चर्चा होणार?
राज्यसभेच्या बुलेटिननुसार, संसदेच्या विशेष अधिवेशनात 3 विधेयकांवर राज्यसभेत आणि 2 विधेयकांवर लोकसभेत चर्चा होणार आहे.
 
पोस्ट ऑफिस विधेयक 2023
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती, सेवा आणि कार्यकाळाशी संबंधित विधेयक 2023
निरसन आणि दुरुस्ती विधेयक 2023
अधिवक्ता दुरुस्ती विधेयक 2023
प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023
या विधेयकांमध्ये सर्वाधिक चर्चा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयकाची आहे.
 
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत भारताच्या सरन्यायाधीशांना हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणूनच हे विधेयक आणले जात असल्याचं सांगितलं जातंय.
 
आत्तापर्यंत मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश होतो. नव्या विधेयकात सरन्यायाधीशांच्या जागी एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 



Published By- Priya Dixit