सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (08:26 IST)

आयएमएकडून आज राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता

केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. यावेळी त्यांनी दिवसभर सर्व दवाखाने बंद राहणार असल्याचं जाहीर केलं असून डॉक्टरांनीही दवाखाने बंद ठेवण्याचं आवाहन आयएमएने केलं आहे. त्यामुळे  रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. 
 
आयएमएने एक पत्रक काढून उद्या 11 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा पहाटे 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी आरोग्य यंत्रणेतील काही गोष्टी सुरळीत असणार आहे. त्यात अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, कोविड केअर सेंटर, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत.
 
सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या संस्थेनं एक नोटिफिकेशन काढलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यास शस्रक्रियेसाठी परवानगी दिली गेली आहे. नोटिफिकेशनमध्ये 58 प्रकारच्या शस्रक्रियांची परवानगी दिली गेलीय. यामध्ये साध्या शस्रक्रियांशिवाय मेंदूच्या शस्रक्रियेचाही समावेश आहे. यालाच इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केलाय. IMAच्या म्हणण्यानुसार ही ‘मिक्सोपॅथी’ असून यामुळं रुग्णांचं आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळंच हा संप पुकारण्यात आलाय.