बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (13:28 IST)

मध्य प्रदेशात जिवंत गायींना वाहत्या नदीत का ढकललं जातंय? व्हायरल व्हीडिओमागचं सत्य जाणून घ्या

मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यात जिवंत गायींना नदीच्या वेगवान प्रवाहात फेकल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मंगळवारी (27 ऑगस्ट) ही घटना घडली असून, या प्रकारचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सतना शहरातील बमहौर परिसरातला हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओत दिसतंय की, काही लोक गायींना रेल्वे पुलाखालून वाहणाऱ्या नदीकडे नेत आहेत. यापैकी काही गायी या नदीच्या वेगवान प्रवाहात पडल्या आणि जवळच्या बंधाऱ्याजवळ जाऊन अडकल्या.या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नदीच्या प्रवाहात पडून अनेक गायींचे पाय मोडले, तर बऱ्याच गायींचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

स्थानिक लोकांचा दावा आहे की, सुमारे 20 गायी नदीत पडल्या आणि यापैकी अर्धा डझन गायींचा मृत्यू झाला.
मात्र, पोलिसांचं असं म्हणणं आहे की, चौकशीनंतरच मृत पावलेल्या गायींचा नेमका आकडा कळू शकेल.
नागौदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) विदिता डागर यांनी सांगितलं की, काही लोक भटक्या जनावरांना रेल्वे पुलाखालून नदीत ढकलून देत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
 
त्या पुढे म्हणाल्या की, "घटनास्थळी जाऊन चौकशी केल्यानंतर, या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तीन लोक हे स्थानिक रहिवासी आहेत, आणि एका अल्पवयीन मुलालाही आरोपी करण्यात आलं आहे."या प्रकरणात अटक करण्यात आलेले बेटा बागरी, रवी बागरी आणि रामपाल चौधरी हे तिघेही जवळच्या गावातील रहिवासी आहेत.या चार आरोपींविरुद्ध 4/9 गोवंश प्रतिबंध कायदा आणि बीएनएसच्या कलम 325 (3/5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
'अशी बरीच प्रकरणं घडली आहेत'
भटक्या जनावरांमुळे पिकांचं नुकसान होत असल्यामुळे आरोपींनी हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या भागातील ही पहिलीच घटना नाही.

याआधी देखील मध्य प्रदेशातीलच रेवा जिल्ह्यात असा प्रकार घडला होता. अनेक गायींना डोंगरावर नेऊन तिथून ढकलण्यात आलं होतं. यामुळे बऱ्याच गायींचा मृत्यू झाला होता आणि अनेक गायींचे पाय मोडले होते. गायी आणि भटक्या जनावरांबाबत अशी अनेक क्रूरतेची प्रकरणं या परिसरातून उघडकीस आलेली आहेत.
या भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद द्विवेदी यांच्या म्हणण्यानुसार, अशी प्रकरणे आता सर्रास घडत आहेत.

शिवानंद द्विवेदी म्हणाले की, "यांत्रिकीकरणामुळे गायी आणि बैलांची उपयुक्तता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. जोपर्यंत गायी दूध देतात तोपर्यंतच लोक त्यांना स्वतःकडे ठेवतात. त्यानंतर या जनावरांना मोकळं सोडलं जातं. शेतीसाठी आता बैलांची गरज राहिलेली नाही, त्यामुळे लोक त्यांना रस्त्यावर मोकळं सोडून देतात आणि असे अपघात घडतात."ते म्हणाले की जनावरांची उपयुक्तता वाढवली पाहिजे किंवा टिकवून ठेवली पाहिजे.
 
'भटक्या जनावरांमुळे अपघातही घडले आहेत'
मध्य प्रदेशात भटक्या जनावरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. राज्यात रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर ग्रामीण भागात या भटक्या जनावरांमुळे पिकांचे नुकसान होत आहे.
 
10 ऑगस्ट रोजी भोपाळमध्ये रस्त्यावर बसलेल्या गायीला धडकून प्रत्युष त्रिपाठी या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला होता. प्रत्युष त्याच्या मित्राच्या घरून परतत असताना, त्याला अंधारात बसलेली गाय दिसली नाही. गायीचे शिंग त्याच्या मांडीत घुसले होते. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्याला वाचवता आलं नाही.

भोपाळमधील 60 वर्षीय मुन्नीबाई सोनकर या वनविभागात आउटसोर्स कर्मचारी होत्या. गेल्या आठवड्यात त्या काम करून संध्याकाळी ऑटोने घरी परतत होत्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो उलटला. ऑटोमध्ये चार जण होते. यात तीन जण जखमी झाले मात्र मुन्नीबाई ऑटोखाली दबल्या गेल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राज्यातील रस्त्यांवर दररोज असे डझनभर अपघात होत आहेत. मध्य प्रदेशात गायींसाठी 1563 गोशाळा सुरू आहेत.
 
मात्र, मंजूर गोठ्यांची संख्या 3200 हून अधिक आहे. हजारो गोशाळा असूनही मध्य प्रदेशच्या महामार्गांवर मोकाट गायींचा वावर दिसून येतो. यामुळे केवळ भटक्या जनावरांचाच मृत्यू होत नाही. तर अशा अपघातांमध्ये अनेक माणसं जखमी होत आहेत, ते बऱ्याच जणांचा मृत्यू देखील झालेला आहे.
सरकारने यासाठी काय केलं आहे?
या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारने या महिन्यात उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
 
भटक्या जनावरांच्या समस्येला तोंड देण्यासाठी सरकार 15 दिवसांची विशेष मोहीमही राबवत आहे.
 
सरकारने यापूर्वीही अशा प्रकारच्या मोहिमा राबवल्या असल्या तरी त्यांचा काहीही परिणाम झालेला नाही.
 
या विशेष मोहिमेत भटक्या प्राण्यांच्या नियंत्रणासाठी प्राप्त झालेल्या सूचनांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती यासंबंधीच्या शासन आदेशात देण्यात आली आहे. भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार 2 हजार लोकांना स्वयंसेवक म्हणून नियुक्त करणार आहे. तसा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
 
या कामासाठी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एक हजार गावातील ग्रामपंचायतींमध्ये दोन जणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गायी व इतर गुरे मुख्य रस्त्यावर येऊ न देणे हा त्यांचा मुख्य उद्देश असेल. यासाठी त्यांना 5,000 ते 10,000 रुपये मानधनसुद्धा देण्यात येणार आहे.
 
तसेच, सरकारने भटक्या जनावरांना 'भटके' म्हणायचं नाही, असाही निर्णय घेतला आहे.
 
'भटकी जनावरं नाही तर निराधार जनावरं म्हणा'
मंदसौरचे माजी आमदार यशपाल सिंह सिसोदिया यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सरकारी आदेश काढून 'भटक्या' गुरांना 'निराधार' म्हणण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एका आदेशात बदल करून, भटक्या जनावरांचं नामकरण, निराधार जनावरं करण्याचा निर्णय घेतला आहे.

यशपाल सिंह सिसोदिया म्हणाले की, "या समस्येला तोंड देण्यासाठी शहरांमध्ये 'गौ-अभयारण्ये' बांधली पाहिजेत. खेड्यापाड्यात गोशाळा आहेत, पण शहरांमध्ये तशी सोय नसल्यामुळे अपघात घडत आहेत."
सरकारी आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात एकूण 1 कोटी 87 लाख गायी आहेत.
सरकारने गोशाळांसाठी 252 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात सरकारने अनुसूचित जाती-जमातींसाठी तरतूद केलेल्या रकमेचा काही भाग गायींचा कल्याणासाठी वळवला आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात मध्य प्रदेश सरकारने गायींसाठी दिलं जाणारं अनुदान दुप्पट केलं आहे. आधी एका गायीमागे 20 रुपये मिळायचे आता 40 रुपये दिले जातात.
मध्य प्रदेश गोपालन आणि पशुधन संवर्धन मंडळाचे माजी अध्यक्ष स्वामी अखिलेश्वरानंद गिरी यांनी सांगितले की, "मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिलेल्या सर्व सूचना एक-एक करून अमलात आणल्या जात आहे."ते म्हणाले की, "मंडळाने गायींच्या संदर्भात अभ्यास केला होता आणि त्यांच्या मते आज मध्य प्रदेशात किमान दहा लाख गायी रस्त्यावर आहेत त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे."
 
ते म्हणाले की, "सरकारला गायींसाठी अनेक सूचना दिल्या आहेत. सर्वप्रथम राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या गायींना जवळच्या गोशाळेत नेलं पाहिजे. त्यानंतर निरुपयोगी झालेल्या गायींना जंगलात सोडावं. त्यासाठी जंगल गोवंश वन विहार करावा. तिसरे, गायींना राष्ट्रीय महामार्गालगतच्या तात्पुरत्या निवाऱ्यात ठेवावे. यामध्ये गायी व मानवी जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सांगण्यात आलं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
Published By- Priya Dixit