शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (14:05 IST)

इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

दिल्लीतल्या इंडिया गेटजवळच्या 'अमर जवान ज्योति' स्मारकाजवळ (Amar Jawan Jyoti) अखंड तेवणारी ज्योत आज कायमची शांत करण्यात येईल. या ज्योतिमधून एक मशाल नवीन नॅशनल वॉर मेमोरियलला (National War Memorial) नेत तिथल्या ज्योतिमध्ये विलीन करण्यात येईल. इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
 
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदींनी म्हटलंय, "संपूर्ण देश नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करत असताना मला हे जाहीर करण्यास आनंद होत आहे की त्यांचा ग्रॅनाईटमध्ये घडवलेला पुतळा इंडिया गेटवर उभारला जाईल. भारतावर त्यांचं जे ऋण आहे, त्याचं हे प्रतिक असेल."
 
हा भव्य पुतळा घडवून पूर्ण होत नाही तोवर याठिकाणी होलोग्रामद्वारे नेताजींची प्रतिमा प्रोजेक्ट करण्यात येईल. नेताजींच्या जयंतीला 23 जानेवारी रोजी आपण या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण करणार असल्याचंही पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलंय.
 
शुक्रवारी 21 जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या एका सोहळ्यात अमर जवान ज्योत ही वॉर मेमोरियलच्या स्मारकात विलीन करण्यात येईल.
 
नवी दिल्लीतल्या इंडिया गेट परिसरातच वॉर मेमोरियल उभारण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या युद्धांमध्ये मरण पावलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे.

अमर जवान ज्योतिजवळच 40 एकरांवर पसरलेल्या या वॉर मेमोरियलच्या उभारणीसाठी 176 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्मारकाचं उद्घाटन केलं.
 
इंडिया गेट आणि अमर जवान ज्योति
पहिल्या महायुद्धामध्ये मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ भारतात तेव्हा असणाऱ्या ब्रिटीश सरकारने इंडिया गेट उभारलं.

त्यानंतर 1971मधल्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात मरण पावलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ 1972 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी 'अमर जवान ज्योति' हे स्मारक उभारलं. 26 जानेवारी 1972 रोजी या स्मारकात अखंड तेवणारी ज्योत पेटवण्यात आली.
 
त्यानंतर दर प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान आधी या अमर जवान ज्योतिला वंदन करून मग ध्वजारोहणासाठी राजपथावर दाखल होतात.
 
नॅशनल वॉर मेमोरियल कसं आहे?
अमर जवान ज्योतिजवळच 40 एकरांवर पसरलेल्या या वॉर मेमोरियलच्या उभारणीसाठी 176 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्मारकाचं उद्घाटन केलं.
नॅशनल वॉर मेमोरियलमध्येही एक अखंड तेवणारी ज्योत आहे. याच ज्योतिमध्ये आता अमर जवान ज्योत विलीन करण्यात येईल.

1962 पासून नंतरच्या वेगवेगळ्या युद्धांमध्ये मारल्या गेलेल्या 25,942 सैनिकांची नावं या स्मारकाच्या परिसरातल्या 16 भिंतींवर कोरण्यात आली आहेत.

महाभारतातल्या चक्रव्यूहाप्रमाणे इथे चार चक्र उभारण्यात आली आहेत. अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र आणि रक्षक चक्र अशी नावं त्यांना देण्यात आली आहेत.
 
याशिवाय या मेमोरियलमध्ये राम सुतार यांनी तयार केलेली तांब्याची 6 म्युरल्सही आहेत.
 
निर्णयावर नाराजी
अमर जवान ज्योत विझवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
वीर जवानांसाठी तेवणारी ज्योत विझवण्याचं दुःख वाटत असून काही लोकांना देशप्रेम आणि बलिदान समजत नसल्याचं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलंय.

या सरकारला लोकशाहीतल्या परंपरांचा आदर नसल्याचं ट्वीट काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी केलं आहे.

तर ही 50 वर्षं तेवणारी ज्योत विझवली जात असल्याचं माजी एअरफोर्स पायलट असल्याने आपल्याला वाईट वाटत असल्याचं ट्वीट काँग्रेसचे नळगोंडाचे खासदार उत्तम कुमार रेड्डींनी केलंय.
 
तर ही ज्योत विझवण्यात येत नसून नॅशन वॉर मेमोरियलमधल्या ज्योतीत विलीन करण्यात येत असल्याचं भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट केलंय.

अमर जवान ज्योत आणि नॅशनल वॉर मेमोरियल या दोन्ही ठिकाणी अखंड ज्योती तेवत ठेवाव्यात अशाही भावना अनेक सोशल मीडिया युजर्सनी व्यक्त केल्या आहेत.