सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (13:07 IST)

राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्यावरुन लोकसभेत गदारोळ

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन लोकसभेत मोठा गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी रांचीतल्या सभेत बोलताना देशातील बलात्कार प्रकरणांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
 
रांचीमधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते, "नरेंद्र मोदी म्हणाले होते, मेक इन इंडिया, मात्र सध्या तुम्ही कुठेही पाहिल्यास 'रेप इन इंडिया' दिसतं. उत्तर प्रदेशात मोदींच्या आमदारानं महिलेवर बलात्कार केला. नंतर पीडित महिलेचा अपघात झाला. मात्र, नरेंद्र मोदींनी अवाक्षरही काढला नाही."
 
हाच धागा पकडत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपच्या इतर महिला खासदारांनी लोकसभा सभागृहात राहुल गांधींवर शाब्दिक हल्ला चढवला.
 
राहुल गांधी यांनी सर्व महिलांचा अपमान केलाय आणि त्यामुळं त्यांनी माफी मागितली पाहिजे, असं म्हणत लोकसभेतील भाजपच्या सर्व महिला खासदार आपापल्या जागेवरून उठून घोषणा देत लोकसभाध्यक्षांच्या दिशेनं आल्या.
 
त्यानंतर स्मृती इराणी म्हणाल्या, "इतिहासात हे पहिल्यांदा होतंय की, कुणी नेता म्हणतोय की, महिलांवर बलात्कार झाला पाहिजे. देशातील जनतेला राहुल गांधी हाच संदेश देऊ इच्छित आहेत का?"
 
स्मृती इराणी आणि भाजपच्या इतर महिला खासदारांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या या मुद्द्याला राहुल गांधी यांच्या रांचीतल्या सभेचा संदर्भ होता.
 
लोकसभेत गोंधळ निर्माण झाल्यानं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं.
 
दुसरीकडे, राज्यसभा सभागृहातही राहुल गांधी यांच्याविरुद्ध काही खासदारांनी घोषणाबाजी केली. 'राहुल गांधी माफी मांगो' असं राज्यसभेतल्या काही खासदारांनी म्हटल्यावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं, "जी व्यक्ती या सभागृहाची सदस्य नाही, तिचं नाव इथं घेतलं जाऊ शकत नाही. सभागृहात गदारोळ घालण्याचा कुणालाही अधिकार नाही."