पुणे महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी तिथे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही कारण नसताना अटक केली. त्यामुळे काही काळ महापालिका परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान नगरसेवकांना ताब्यात घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, सेल प्रमुख कार्यकर्ते नव्या इमारतीच्या बाहेर व्यंकय्या नायडू यांचे स्वागत करण्यासाठी उभे होते. परंतु पोलिसांनी ऐनवेळी त्यांची जागा बदलली. हे नगरसेवक आणि कार्यकर्ते नव्या जागी थांबले असता पोलिसांनी त्यांना गाडीत भरून शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात नेले आणि काही वेळानंतर सोडून दिले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी पोलिसांच्या या कृतीविषयी संताप व्यक्त केला आहे. या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाही आमंत्रण होते. मात्र काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व्यंकय्या नायडू यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही जमलो होतो, असे चेतन तुपे यांनी सांगितले. आमच्या काही नगरसेवक,कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी उचलून गाडीत टाकले आणि शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात घेऊन गेले. तसेच कार्यक्रम स्थळी येण्याचे पासेस असतानाही अटकाव करण्यात आला त्यामुळे आम्हाला कार्यक्रमाला उपस्थित रहाता आले नाही, असेही त्यांनी सांगितले.