मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 जानेवारी 2022 (16:58 IST)

RRB NTPC: रेल्वे परीक्षांच्या निकालावरून विद्यार्थी एवढे आक्रमक का?

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पाटणा येथील 'भिखना पहाडी' परिसरात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. सलग दुसऱ्या दिवशी रेल्वेची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
 
पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला आणि पलटवार करत विद्यार्थ्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचंही वृत्त आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.
 
बिहारच्या इतर जिल्ह्यातही आंदोलक विद्यार्थ्यांनी रेल्वेचं नुकासान केल्याचं वृत्त समोर येत आहेत. तसंच काही फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

आरा येथे रेल्वेच्या डब्याला आग लावल्याची माहिती समोर येत आहे. तसंच नवादा येथे आंदोलकांनी डायनेमिक टेम्पिंग एक्सप्रेस मशीनलाही आग लावल्याचं काही फोटोंमध्ये दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांचं हे आंदोलन बिहारनंतर आता शेजारील राज्य उत्तर प्रदेशपर्यंत पोहचलं आहे. प्रयागराज आणि इतर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी 'रेल्वे रोको' आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. या दरम्यान पोलिसांनी कारवाई केल्याचे फोटो आणि व्हिडिओ आता प्रसिद्ध होत आहेत.
 
नेमकं प्रकरण काय आहे?
मंगळवारी  बिहारमध्ये रेल्वेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डच्या माध्यमातून नॉन टेक्निकल पॉप्यूलर कॅटगरीतील (RRB NTPC Result) विविध पदांच्या भरती प्रक्रियेत घोळ आणि निष्काळजीपणा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
 
या विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन आता अधिक आक्रमक झालं आहे.
 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बिहारमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली. तर काही ठिकाणी रेल्वेचे वेळापत्रक आणि मार्ग बदलावे लागले.
 
सोमवारी विद्यार्थ्यांनी पाटणाच्या 'राजेंद्र नगर टर्मिनल' येथे कित्येक तास 'रेल रोको' आंदोलन केले.
 
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर रेल्वे प्रशासानाने एनटीपीसी आणि लेवल वन परीक्षा रद्द केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोपांनंतर रेल्वेने तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे.
 
विद्यार्थी आंदोलन का करत आहेत?
 
2019 मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीवेळी रेल्वेने एनटीपीसीच्या माध्यमातून 35 हजार 308 पदांसाठी आणि गट 'ड' पदांसाठी अशा एकूण जवळपास एक लाख तीन हजार पदांसाठी अर्ज मागवले होते.
 
फेब्रुवारी-मार्च दरम्यान विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. एप्रिल-मे महिन्यात नवीन सरकार आले. जुलैपर्यंत परीक्षा घेण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं. परंतु वर्षभरात म्हणजेच वर्ष 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या नाहीत.
 
पटणा येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अमरजीत यांनी हजेरी लावली होती. ते म्हणाले, "2021 मध्ये परीक्षा पार पडली. 2022 मध्ये CBT-1 (NTPC) निकाल जाहीर केला."
 
त्यावेळी नोटिफिकेशनमध्ये रेल्वे बोर्डने CBT-1 (NTPC) मध्ये 20 पट निकाल दिला जाईल असं सांगितलं होतं. परंतु त्यांनी एका विद्यार्थ्याची पाच ठिकाणी नोंद ग्राह्य धरली. यामुळे प्रत्यक्षात रेल्वे बोर्डाने केवळ 10-11 पट निकाल दिल्याचं स्पष्ट झालं."
 
आणखी एका विद्यार्थ्याने सांगितलं की, एनटीपीसीने जाहीर केलेल्या निकालात पाच लेवल जनरेट केल्या आहेत. यानुसार काही विद्यार्थ्यांचा निकाल पाचही लेवलमध्ये आहे तर काहींचा केवळ चार किंवा तीन लेवलमध्ये. तर काहींना चांगले गुण असूनही एकाही लेवलमध्ये निकाल नाही.
रेल्वे बोर्डाने 'एक विद्यार्थी-एक निकाल' यानुसार निकाल जाहीर करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. रेल्वेच्या आताच्या निकाल प्रणालीनुसार काही पात्र विद्यार्थ्यांना प्रक्रियेतून बाहेर पडावं लागत आहे. यामुळे परीक्षार्थी गुड्स गार्ड आणि स्टेशन मास्ट अशा पदांसाठी पात्र ठरू शकणार नाही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
अमित या विद्यार्थ्याचा दावा आहे की, रेल्वेने एकाच विद्यार्थ्याचं नाव चार ते पाच पोस्टसाठी रिपीट केलं आहे. "एखाद्या विद्यार्थ्याची निवड पाच पदांसाठी झाली आणि त्याने मेन्स परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी सुद्धा पास केली तर रेल्वे त्या विद्यार्थ्याला कुठे नोकरी देणार?"असाही प्रश्न अमित यांनी उपस्थित केला.
 
एका विद्यार्थ्याला एकावेळी एकाच पदावर नोकरी मिळू शकते. मग अनेक पदांसाठी त्याची निवड करून इतर पदं नंतर रिक्त का ठेवायची? असंही त्यांचं म्हणणं आहे.
 
रेल्वे मंत्रालयाचा इशारा
आंदोलन विद्यार्थ्यांना रेल्वे मंत्रालयाने इशारा दिला आहे. यासंदर्भात रेल्वेने नोटीस जारी केली आहे.
 
"रेल्वेच्या पदांसाठी इच्छुक उमेदवार रेल्वे रुळांवर आणि इतर ठिकाणी आंदोलन करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. रेल्वेचं नुकसान करणं कायदाबाह्य आहे. अशा घटनांवर कारवाई केली जाईल. यामुळे सरकारी नोकरीची संधीही धोक्यात येऊ शकते." असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
विशेष एजन्सीच्या मदतीने अशा घटनांचे व्हिडिओ पाहून चौकशी केली जाईल. कायदाबाह्य कृती केलेल्या उमेदवारांवर पोलीस कारवाईसोबत त्यांची रेल्वेची नोकरी मिळवण्याच्या संधीवर कायमस्वरुपी प्रतिबंध आणला जाऊ शकतो असंही रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.