शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2023 (19:34 IST)

समीर वानखेडे : शाहरूख खानकडून 25 कोटींची मागणी?, हे आहेत 10 गंभीर आरोप

sameer wankhede
एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना सीबीआयने आज (21 मे) ला पुन्हा एकदा चौकशीला बोलावलं आहे. आर्यन खानला खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली त्यांची चौकशी सुरू आहे. वानखेडे यांच्या वकील शुभि श्रीवास्तव यांनी बीबीसीला ही माहिती दिली.
 
“माझे अशिल समीर वानखेडे यांनी सीबीआय ने आर्यन खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं आहे.” शुभि यांनी सांगितलं.
 
मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश शर्मिला देशमुख, न्या. आरिफ डॉक्टर यांनी समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं तसंच कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले. सीबीआयच्या चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं आश्वासन समीर वानखेडे यांनी दिल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला.
 
दिल्ली हायकोर्टाने त्यांना 22 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं होतं. मात्र तरीही मुंबई हायकोर्टात जाण्यास दिल्ली हायकोर्टाने त्यांना सांगितलं होतं.
 
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) भारतीय महसूल सेवेतील अधिकारी (IRS) समीर वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
अभिनेता शाहरूख खान याच्याकडून 25 कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपापासून ते महागडी घड्याळं, परदेशी प्रवास यांचा हिशेबही समीर वानखेडे देऊ शकले नाहीत.
 
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या व्हिजिलन्स विभागाचे अधीक्षक कपिल यांनी 11 मे 2023 रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, सरकारी कर्मचाऱ्यानं लाच घेणं, सरकारी कर्मचारी असल्याचा भ्रष्टाचारी आणि अवैध गोष्टींसाठी फायदा घेणं, मौल्यवान वस्तू कुणालाही न सांगता मिळवणं, गुन्हेगारी कट रचणं, धमकीद्वारे खंडणी मागणं इत्यादी तक्रारी एफआयरमध्ये करण्यात आल्या.
 
या तक्रारीनुसार सीबीआय समीर वानखेडेंसह इतरांची चौकशी करणार आहे. या एफआयआरमध्ये कुणा-कुणाला आरोपी करण्यात आलंय :
 
1. समीर वानखेडे, एनसीबीच्या मुंबई विभाग युनिटचे तत्कालीन विभागीय संचालक
 
2. विश्व विजय सिंग, एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक
 
3. आशिष रंजन, एनसीबीच्या मुंबई विभाग युनिटचे तत्कालीन इंटेलिजियन्स ऑफिसर
 
4. के. पी. गोसावी, खासगी व्यक्ती
 
5. सॅन्विल डीसोझा, खासगी व्यक्ती
 
6. इतर अज्ञात व्यक्ती
 
या आरोपींमध्ये तिघेजण एनसीबी म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी आहेत. ते म्हणजे, समीर वानखेडे, विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन.
 
या तिघांवरील आरोप सविस्तरपणे या एफआयआरमध्ये सांगण्यात आलं असून, ज्या घटनेमुळे हे सर्व घडलं, ते कॉर्डेलिया क्रूझ शिपवरील छाप्याचं प्रकरणही विस्तृतपणे सांगण्यात आलंय.
 
आपण या बातमीतून समीर वानखेडे आणि एनसीबीच्या इतर दोन अधिकाऱ्यांची होणारी चौकशी नेमकी कोणत्या आरोपांमुळे होणार आहे, हे पाहू.
 
‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं होतं?
कॉर्डेलिया क्रूझ शिपचं म्हणजेच तुम्ही-आम्ही ज्याला ‘आर्यन खान प्रकरण’ म्हणू ओळखतो, हे प्रकरण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या लेखी ‘Case no. 94 of 2021’ असं नोंदवलेलं आहे.
 
2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीच्या मुंबई विभागाला गुप्त माहिती मिळाली की, कॉर्डेलिया क्रूझ शिपमध्ये अंमली पदार्थांचा साठा असून, तिथं अंमली पदार्थांचा वापरही होणार आहे.
 
IRS समीर वानखेडे हे या काळात एनसीबीच्या मुंबई विभागाचे विभागीय संचालक होते.
 
त्यामुळे समीर वानखेडे आणि अधीक्षक व्ही. व्ही. सिंग यांनी पथक तयार केलं आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या इंटरनॅशनल टर्मिल बिल्डिंगच्या ग्रीन गेटवरून छापा टाकला. यावेळी आशिष रंजन हे तपास अधिकारी म्हणून, तर किरण गोसावी आणि प्रभाकर साईल यांना स्वतंत्र साक्षीदार म्हणून एनसीबीनं सोबत नेलं.
 
हा संपूर्ण छापा समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग आणि आशिष रंजन यांच्या देखरेखीखाली झाला.
 
छापा टाकणाऱ्या टीमच्या चौकशीत काय सापडलं?
या छाप्यावर संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर 25 ऑक्टोबर 2021 रोजी स्पेशल इन्क्वायरी टीम (SET) स्थापन करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे डीडीजी हे या टीमचे चेअरमन होते. छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवरील आरोपांची चौकशी SET मार्फत केली गेली.
 
चौकशीदरम्यान SET ने एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे मुंबई आणि दिल्लीत जबाब घेतले. तसंच, स्वतंत्र साक्षीदारांचीही SET ने चौकशी केली.
 
या चौकशीत SET नं समीर वानखेडेंच्या नेतृत्त्वातील मुंबई विभागाच्या एनसीबीबाबत काही गंभीर गोष्टी नोंदवल्या. त्या आपण एक एक करून जाणून घेऊ.
 
छाप्यावर प्रश्न उपस्थित करणारे 10 गंभीर आरोप :
1) कॉर्डेलिया क्रूझवर 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीनं फर्स्ट इन्फर्मेशन नोट म्हणजे एनसीबीच्या भाषेत जिला ‘I-Note’ म्हणतात, तिच्यातून काहीजणांनी नावं वगळली. म्हणजे I-Note मध्ये एकूण 27 जणांची नावं होती, मात्र या नोटमध्ये दुरुस्ती करून त्यात केवेळ 10 जणांचीच नावं ठेवण्यात आली.
 
2) एनसीबीचे तपास अधिकारी आशिष रंजन हे जेव्हा कॉर्डेलिया क्रूझच्या डिपार्चर गेटपाशी तपास करत होते, त्यावेळी संशयित अरबाझ ए. मर्चंट यानं मान्य केलं होतं की, त्याच्या शूजमध्ये चरस लपवलं होतं आणि ते छाप्यानंतर आशिष रंजन यांच्याकडे सुपूर्द केलं होतं. मात्र, अरबाझ ए. मर्चंटचं नाव कागदोपत्री नोंदवण्यात आलं नाही. शिवाय, इतरही अनेक संशयितांना कुठल्याही नोंदणीविना जाऊ देण्यात आलं.
 
3) अरबाझ ए. मर्चंटला चरस पुरवल्याचा आरोप सिद्धार्थ शाह याच्यावर होता. सिद्धार्थ शाह यानं हे मान्य केलं होतं की, अरबाझनं मला पैसे देऊन चरस खरेदी केलं होतं, शिवाय चॅट मेसेजमधून दिसतंय की, तो (सिद्धार्थ शाह) स्वत:ही चरस सेवन करत होता. तरीही एनसीबीच्या मुंबई विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ शाहला मोकळं सोडून दिलं.
 
4) SET नं छाप्यातील एनसीबी अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर असं समोर आलं की, या छाप्यातील आरोपींना स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावीच्या खासगी गाडीतून एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणण्यात आलं.
 
5) के. पी. गोसावी याला आरोपींच्या आवती-भोवती वावरू दिलं गेलं. त्यावरून गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचं प्रतित झालं. एनसीबीचे अधिकारी उपस्थित असतानाही गोसावी आरोपींच्या आजूबाजूला वावरत होता. हा प्रकार स्वतंत्र साक्षीदारासाठीच्या नियमांविरुद्ध आहे. तसंच, के. पी. गोसावी यानं आरोपींसोबत सेल्फी फोटो काढले, शिवाय आरोपींचा आवाजही रेकॉर्ड केला.
 
6) या सगळ्यामुळेच के. पी. गोसावी आणि सॅन्विल डीसोझा यांनी इतरांसह खंडणीचा कट केला. त्यानुसार, आर्यन खानच्या (अभिनेता शाहरूख खानचा मुलगा) कुटुंबाला धमकी दिली की, आर्यन खानकडे अंमली पदार्थ सापडले आहेत. या धमकीच्या आधारेच 25 कोटींची खंडणी मागितली गेली. ही रक्कम 18 कोटींवर तडजोड केली गेली. त्यातील 50 लाख रुपये गोसावी आणि डीसोझा यांनी घेतले. मात्र, या 50 लाखातले काही रक्कम परत दिली गेली.
 
7) समीर वानखेडे हे एनसीबीच्या मुंबई विभागाचे विभागीय संचालक होते. त्यांच्या नेतृत्त्वातच हा छापा टाकण्यात आला होता. वानखेडेंनीच के. पी. गोसावी आणि प्रभाकर साईल यांना स्वतंत्र साक्षीदार म्हणून घेतलं होतं. शिवाय, आरोपींना हाताळण्याची गोसीवाला मोकळीक वानखेडेंनीच दिली होती. 
 
8) SET ने आपल्या चौकशीत समीर वानखेडे यांच्याबाबताही काही गंभीर गोष्टी समोर आणल्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे, समीर वानखेडे यांच्या गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारी प्रकरणांबाबत. समीर वानखेडे आणि आशिष रंजन हे त्यांच्या जाहीर केलेल्या मालमत्तेचे समाधानकारक पुरावे सादर करू शकले नाहीत.
 
9) तसंच, समीर वानखेडे हे त्यांच्या परदेश भेटी आणि या भेटींवर खर्चाचीही नीट आणि समाधानकार माहिती देऊ शकले नाहीत. तसंच, परदेश भेटींचे स्रोतही त्यांनी नीट सांगितले नाहीत.
 
10) आपल्या विभागाला सूचित न करता, समीर वानखेडे यांनी त्रयस्थ व्यक्ती विरल रंजन यांच्याबरोबरीने महागड्या घड्याळ्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात सहभाग नोंदवला.
 
या सर्व आरोपांची सविस्तर माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या व्हिजिलन्स विभागाचे अधीक्षक कपिल यांनी FIR मध्ये दिलीय. यानुसार आता सीबीआयचे डीएसपी मुकेश कुमार हे तपास करतील.
Published By -Smita Joshi