बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव राजकीय नेत्या

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 या कालावधीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव राजकीय नेत्या होत्या.
 
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्याचां समावेश होता. 11 मार्च 2014 ते 25 ऑगस्ट 2014 या कालावधीमध्ये त्या केरळ राज्याच्या राज्यपालही होत्या. 2017 साली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळेस त्या काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार होत्या. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात त्या दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी ईशान्य दिल्लीमधून लोकसभेची निवडणूक लढवली मात्र त्यांना भाजपाच्या मनोज तिवारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
 
राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संपूर्ण आयुष्यभर त्या काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या राहिल्या अशी भावना काँग्रेसने व्यक्त केली आहे. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळावं हीच प्रार्थना असं काँग्रेसने ट्वीट केलं आहे.
 
शीला दीक्षित यांचं निधन झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी, राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
 
दीक्षित यांनी दिल्लीच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले होते असं ट्वीटरवर लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीचं मोठं नुकसान झालं असून त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच लक्षात राहिल असं ट्वीट केलं आहे.
 
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एका राजकीय युगाचा अस्त झाला. त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या. गेली 40 वर्षे म्ही एकमेकांना ओळखत होतो. अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही त्यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत श्रद्धांजली वाहिली आहे.