खासदार गायकवाड यांनी केली एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करत शिवीगाळ केली आहे. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला. विमानात बसण्याच्या जागेवरुन हा वाद झाला. रवींद्र गायकवाड आणि कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी रवींद्र गायकवाड यांनी कर्मचा-याला शिवीगाळ करत मारहाण केली, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले. तसेच, या मारहाणीसंदर्भात चौकशी करण्यासाठी एअर इंडियाने एक समिती स्थापन केली आहे.
याप्रकरणी रवींद्र गायकवाड म्हणाले की, माझे बिझनेस क्लासचे तिकीट होते, मात्र मला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितले. यावर मी तक्रार केली असता एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने माझ्यासोबत गैरवर्तन केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यास सांगितले. यावेळी मी त्याला शिवीगाळ केली आणि मारहाण केली, असे रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले. रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत.