रेशनवर 1500 रुपये खर्च केले म्हणून मुलाने 60 वर्षीय आईला मारून टाकले
छत्तीसगडच्या बिलासपूरमधून आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. 1500 रुपयांवरुन ही घटना घडली. येथे एका मुलाने अवघ्या 1500 रुपयांसाठी आईला विटेने मारहाण करून ठार मारले आहे. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मात्र काही तासांच्या शोधानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली.
आईची निर्घृण हत्या केली
हे प्रकरण बिलासपूर जिल्ह्यातील कोटा पोलीस स्टेशन परिसरातील पतैता ग्रामपंचायतीशी संबंधित आहे. प्रेम यादव उर्फ सलल्हा यादव असे आरोपी मुलाचे नाव आहे. कोटा पोलिस स्टेशनने सांगितले की, 29 मे रोजी पतैता ग्रामपंचायतीच्या कोरीपारा येथे एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह असल्याची माहिती त्यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात कुटुंबीयांना समजले की, महिलेच्या मुलानेच आपल्या आईची इतकी निर्घृण हत्या केली होती. कुंतीबाई (60) असे मृत महिलेचे नाव आहे.
आईने रेशनवर 1500 रुपये खर्च केले
महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आरोपी सलल्हा यादवने आईची हत्या करून जंगलात पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने जंगलाला वेढा घातला आणि सतत 2 तास शोध मोहीम राबवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला पतैता-कोरी जंगलातून अटक केली आहे. चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने आई कुंतीबाई यांच्याकडे 1500 रुपये मागितले होते. यावर आईने सांगितले की, रेशन खरेदीसाठी पैसे खर्च झाले. आईचे हे उत्तर ऐकून मुलगा संतापला आणि पैसे न दिल्याने आईच्या डोक्यात विटांनी वार करू लागला. मुलाचा राग एवढा तीव्र होता की त्याने विटेने वार करून आईचा जीव घेतला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.