Sonali Phogat Cremation: सोनाली फोगाट अंत्यसंस्कार, मुलीने मुखाग्नी दिली
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांची कन्या यशोधरा हिने त्यांना मुखाग्नी दिला. त्यांचे पार्थिव भाजपच्या झेंड्यात गुंडाळण्यात आले. त्यांच्या मुलीने यशोधरानेही आईच्या पार्थिवाला खांदा दिला. आईचा मृतदेह पाहून यशोधराला रडू कोसळले, त्यानंतर उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. माजी आमदार कुलदीप बिश्नोई देखील सोनाली फोगटच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले.शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या धांदूर येथील फार्म हाऊसवर अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. त्यांचा मृतदेह फार्म हाऊसवर येताच तेथे उपस्थित कुटुंबीयांना रडू कोसळले.
भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली. सुधीर सागंवान आणि सुखविंदर वासी अशी या दोघांची नावं आहेत.
गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं सोनाली फोगाट यांचं निधन झालं. मात्र, त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर बुधवारी म्हणजे 24 ऑगस्टला गोवा पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची तक्रार दाखल करून घेतली आणि आता हत्येचा कलमही त्यात जोडण्यात आलाय.
गोव्याच्या मापुसाचे डीसीपी जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्राथमिक चौकशीनुसार सोनाली फोगाट 22 ऑगस्टच्या रात्री गोव्यात आल्या होत्या आणि अंजुनाच्या एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. मंगळवारी म्हणजे 23 ऑगस्टला सकाळी त्यांची तब्येत ठिक नसल्याच्या कारणानं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं."
सोनाली फोगाट यांच्या भावाने या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त केला आहे. सोनाली यांचा गोव्याला येण्याचा कोणताही प्लॅन नव्हता. हे पूर्वनियोजित कारस्थान असावं, असा संशयही सोनाली यांच्या भावाने बोलून दाखवला.
सोनाली फोगाट हत्येप्रकरणी हरियाणा सरकारने सीबीआय चौकशी करण्याचे मान्य केले आहे.
गोवा पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा चंदीगड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याची मागणीही गोवा पोलिसांनी मान्य केली आहे. हिसार येथील सोनाली फोगटच्या फार्म हाऊसमधून मोबाईल, लॅपटॉप आणि इतर वस्तूंच्या चोरीबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, ही जुनी बाब आहे. कुटुंबीयांनी तक्रार दिल्यास सीसीटीव्ही फुटेज आणि वस्तुस्थितीच्या आधारे कारवाई केली जाईल.