शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (07:53 IST)

कॉंग्रेसकडून ‘शेतकरी बचाव रॅली’चे राज्यव्यापी आंदोलन

केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून या संघर्षाच्या पुढच्या टप्प्यात उद्या १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले आहे. यामध्ये राज्यातील सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी काँग्रेस नेते १० हजार गावातील ५० लाख शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आपल्या न्याय हक्काच्या या लढाईत शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
 
महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी- #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम राबविण्यात आली होती. २८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना निवेदन देऊन हे कायदे रद्द करण्याची मागणी केली होती. तर २ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन व मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनाचा पुढच्या टप्प्यात आज १५ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता ‘शेतकरी बचाओ रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शेतकरी बचाव रॅलीचा’ कार्यक्रम राज्यातील सहा ठिकाणांहून एकाच वेळी होणार आहे. हे सर्व कार्यक्रम एकमेकांशी इंटर कनेक्ट असून सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.