बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2018 (09:30 IST)

कलबुर्गी खूनप्रकरण : न्यायालयाकडून नोटीस जारी

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्य शासन, सीबीआय, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांना नोटीस बजावली. त्यामुळे आता कलबुर्गी यांच्यासह डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे या विचारवंतांच्या खुनाच्या तपासालाही वेग येऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. नोटीस बजावल्याने तपास यंत्रणा व राज्य सरकारे यांच्यावरील दबावही वाढला आहे.

या खूनप्रकरणी कोणत्याच तपास यंत्रणेकडून पुरेसा गांभीर्याने तपास केला जात नसल्याने कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दहा दिवसांपूर्वी स्वतंत्र याचिका दाखल केली. त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश अजय खानविलकर व धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर झाली. कलबुर्गी यांच्यावतीने अ‍ॅड. अभय नेवगी व त्यांचे सहाय्यक किशनकुमार यांनी न्यायालयात बाजू मांडली.