रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (22:31 IST)

सुरेंद्रन पटेल : भारतातला एकेकाळचा बिडी कामगार असा झाला अमेरिकन न्यायाधीश

surendra k patel
मागच्या आठवड्यात भारतीय-अमेरिकन नागरिक सुरेंद्रन के. पटेल यांनी अमेरिकेच्या टेक्सास राज्यात जिल्हा न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. बीबीसी हिंदीच्या इमरान कुरेशी यांनी गरीब मजूर कुटुंबात जन्मलेल्या सुरेंद्रन यांची यशोगाथा सांगितली. विडी कामगार ते अमेरिकेतील जिल्हा न्यायाधीश असा प्रवास केलेल्या सुरेंद्रन यांची कथा एखाद्या सिनेमासारखी वाटते.
 
मूळचे केरळचे असलेल्या पटेल यांची अमेरिकेच्या टेक्सासमधील फोर्ट बेंड काउंटी येथील 240 व्या न्यायिक जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
51 वर्षीय पटेल यांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेऊन पाच वर्षे लोटली. नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारी रोजी त्यांनी न्यायाधीश पदाची शपथ घेतली.
पण गरीब कुटुंबात जन्मलेल्या पटेल यांचा न्यायाधीश होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. कठोर परिश्रम, निर्धार, आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे पद मिळवल्याचं ते सांगतात.
 
पण या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर मला पाठिंबा देणारे आणि मदत करणारे बरेच लोक भेटल्याचं पटेल सांगतात.
 
पटेल यांचा जन्म केरळमधील. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पदरी 6 मुलं असल्याने त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांचे आई-वडील रोजंदारीवर काम करायचे.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पटेल यांना बालपणीच बीडी वळण्याच्या कारखान्यात काम करावं लागलं.  
 
पटेल सांगतात, "मी आणि माझी मोठी बहीण रात्री उशिरापर्यंत कारखान्यात काम करायचो. जेणेकरुन दोन वेळंचं जेवण मिळेल."
 
एक काळ असा होता की, पटेल यांना परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने शाळा मध्येच सोडून द्यावी लागली होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या मोठ्या बहिणीचा मृत्यू झाला होता. तिला 15 महिन्यांची मुलगी होती.
 
घटनेच्या अधिक तपशीलात न जाता पटेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "बहिणीने आत्महत्या केलीय असं प्रत्यक्षात वाटत असलं तरी या घटनेत तिला न्याय मिळाला नाही. आजही या गोष्टींचा मला त्रास होतो."
 
या घटनेने पटेल मनातून हादरून गेले होते. पुढे त्यांनी शाळेत पुन्हा प्रवेश घेतला आणि जीव तोडून अभ्यास केला. दहावी नंतरच्या दोन वर्षांच्या प्री-डिग्री कोर्सला असताना कामामुळे अनेकदा त्यांचं कॉलेज बुडायचं.
 
कॉलेजच्या पहिल्याच वर्षात कॉलेज चुकवल्यामुळे त्यांची उपस्थिती कमी भरली. साहजिकच परीक्षेसाठी पात्र नाही असं सांगत शिक्षकांनी त्यांना परीक्षा द्यायला मनाई केली. मात्र पटेल यांनी परीक्षेला बसू द्यावं म्हणून शिक्षकांकडे विनवणी केली.
 
"मला माझ्या आर्थिक परिस्थितीविषयी सांगून सहानुभूती नको होती, " असं पटेल सांगतात.
 
शेवटी शिक्षकांना पटेल यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी त्यांच्या काही मित्रांकडूनच समजलं. आणि शिक्षकांनी पटेल यांना संधी द्यायचं ठरवलं.
परीक्षा होऊन जेव्हा निकाल लागले तेव्हा पटेल वर्गात दुसरे आले होते. हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता.
त्यांनी कायद्याची पदवी घ्यायचं ठरवलं. ते सांगतात, "मला कधीच दुसरं काही करावंसं वाटलं नाही. मला कायद्याच्या शिक्षणाविषयी ओढ होती."
आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या समोर बरीच आव्हानं निर्माण झाली. मात्र या प्रवासात अनेक उदार लोकही त्यांना भेटले, ज्यांच्यामुळे मदत झाली.
 
यांच्यापैकीच एक होते उत्तुप्पा. उत्तुप्पा केरळमध्ये एक हॉटेल चालवायचे.
 
पटेल सांगतात, "मी त्यांच्याकडे नोकरी मागायला गेलो आणि नोकरी मिळाली नाही तर शिक्षण सोडावं लागेल असंही सांगितलं. त्यामुळे उत्तुप्पा यांनी मला हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून नोकरीवर ठेवलं."
 
उत्तुपा हयात असेपर्यंत त्यांचे हे संबंध जिव्हाळ्याचे राहिले.
 
पटेल पुढे सांगतात, "मी न्यायाधीश झाल्याची बातमी ऐकून त्यांच्या भावाने मॅन्युएलने मला फोन केला."
 
पटेल यांनी 1992 साली राज्यशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर कायद्याचा अभ्यास सुरू केला.
 
चार वर्षानंतर पटेल यांनी वकील पी. अप्पुकट्टन यांच्याकडे नोकरी धरली. ही नोकरी केरळच्या कासरगोड जिल्ह्यातील होसदुर्ग शहरात होती.
 
अप्पुकुटन बीबीसीशी बोलताना सांगतात की, "तो खूप उत्साही तरुण होता. त्याच्या कामाची पद्धत आणि त्याची क्षमता पाहून मी त्याच्याकडे सर्व प्रकारचे दिवाणी खटले सोपवले."
 
पटेल यांनी जवळपास दहा वर्षे होसदुर्ग शहरात काम केलं. नंतर त्यांची पत्नी सुभा यांना दिल्लीतील एका रुग्णालयात नोकरी मिळाली आणि ते दिल्लीला रवाना झाले.
त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला कारण, त्यांना आपल्या पत्नीच्या करिअरमध्ये अडथळा बनायचं नव्हतं.
 
सुरुवातीचे काही महिने, त्यांनी दिल्लीत सुप्रीम कोर्टाच्या एका वकिलासोबत काम केलं. पण यादरम्यान त्यांच्या पत्नीला अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली.
 
पटेल सांगतात, "यावेळी मला माझं प्रोफेशन सोडून तिच्यासोबत जाण्यात रस नव्हता. मात्र तरीही मी तिच्यासोबत अमेरिकेला गेलो आणि आज मी इथंवर येऊन पोहोचलो."
 
पटेल आणि त्यांच्या पत्नी 2007 साली अमेरिकेतील टेक्सासमध्ये शिफ्ट झाले. तिथं पटेल यांनी काही दिवस एका किराणा दुकानात काम केलं. त्यानंतर ते टेक्सासमध्ये बार एक्झाम देऊ शकतात हे समजलं. याच प्रयत्नात पटेल यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याची पदवी मिळवली.
 
पुढे पटेल यांनी न्यायाधीशपदासाठी डेमोक्रॅटिक पार्टी सोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रचार करताना भारतीय उच्चारांमुळे त्यांची खिल्ली उडवण्यात आल्याचं ते सांगतात.
 
पटेल पुढं सांगतात, "पण यामुळे मी व्यथित झालो नाही. प्रचारसभेदरम्यान चिखलफेक होतच राहते. तुम्ही इथं किती दिवस राहिलात याने काही फरक पडत नाही, तुम्ही जनतेची सेवा केलीय का, हे खूप महत्त्वाचं असतं." सुरेंद्रन यांना 2017 मध्ये अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं, ते 2022 मध्ये न्यायाधीश झाले. हे फक्त अमेरिकेतच घडू शकतं असं सुरेंद्रन यांना वाटतं.
 
त्यांचा हा विजय वैयक्तिक कारणासाठीही खास आहे.
 
टेक्सासमध्ये प्रॅक्टिस करत असताना, पटेल यांची सिनियर वकील ग्लेंडेन बी अॅडम्स यांच्याशी घनिष्ट मैत्री झाली.
 
अॅडम्स यांच्या मृत्यूनंतर पटेल यांनी त्यांचं उत्तराधिकारी व्हावं असं अॅडम्स यांच्या पत्नीला रोझली अॅडम्स यांना वाटत होतं.
 
बुधवारी (11 जानेवारी) जेव्हा पटेल यांनी ही नवी जबाबदारी स्विकारली तेव्हा रोझली अॅडम्स यांनी कोर्टरूममध्ये येऊन पटेल यांच्या अंगावर काळ्या रंगाचा कोट चढवला.

Published By- Priya Dixit