शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (10:03 IST)

संशियत दहशतवाद्याला अटक, मंदीर हल्ल्याचा कट उघड

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने हिजबूल मुजाहिद्दीनच्या संशियत दहशतवाद्याला अटक केली आहे. दहशतवाद्याने गणेश चतुर्थीला एका प्रसिद्ध मंदिरावर हल्ल्याचा कट आखला होता. मात्र दहशतवाद विरोधी पथकाने वेळीच कारवाई करत त्याला अटक केली. सदरच्या दहशतवाद्याचं नाव कामेर उज्जमान (३७) असून तो आसामचा रहिवासी आहे. 
 
कानपूरमधील चाकेरी परिसरातून अटक करण्यात आलेला कामेर आसाममधून बेपत्ता झाला होता. त्याच्या मोबाइलमधील व्हिडीओ तपासले असता तो शहरातील काही मंदिरांची रेकी करत असल्याचं समोर आलं आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. कानपूर पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्या सहाय्याने दहशतवाद विरोधी पथकाने अटकेची कारवाई केली. ‘कामेर सोशल मीडियावर सक्रीय होता. त्याने एप्रिल २०१८ मध्ये एके-४७ हातात घेतलेला स्वत:चा फोटो शेअर केला होता. तेव्हापासूनच तो आमच्या रडारवर होता’,अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे. कामेरचा तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.