गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 2 जुलै 2022 (19:04 IST)

तीस्ता सेटलवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

अहमदाबाद मेट्रोपॉलिटन कोर्टाने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड आणि आरबी श्रीकुमार यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात पोलिसांनी दोघांचा रिमांड वाढवण्याची मागणी केली नव्हती. पोलिसांनी या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती केली होती. गुजरात एटीएसनं या दोघांना ताब्यात घेतलं होतं.
 
तुरुंगात दंगलींचे आरोपी आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे, असं तीस्ता यांनी न्यायालयाला सांगितलं. कोर्ट थोड्या वेळात त्यांच्या सुरक्षेबाबत टिप्पणी करणार आहे.
 
श्रीकुमार यांनी आपलं वक्तव्य दंडसंहिता कलम 164च्या अंतर्गत नोंदवण्यात यावं असं म्हटलं आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, तीस्ता सेटलवाड यांना त्यांच्या मुंबईतील घरातून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
 
एनजीओशी संबंधित एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलं होतं.
 
तिस्ता सेटलवाड यांना रविवारी (26 जून) वैद्यकीय तपासणीसाठी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात नेण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
 
तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेनंतर त्यांनी दावा केलाय की त्यांना झालेली 'अटक' बेकायदेशीर असून त्यांच्या जीवाला धोका आहे.
 
2002 च्या गुजरात दंगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर 63 जणांना एसआयटीने दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (24 जून) फेटाळून लावली.
 
अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह एकूण 69 जणांचा मृत्यू झाला होता.
 
या प्रकरणात नरेंद्र मोदी आणि इतर कथित गुन्हेगारांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) क्लीन चिट दिली होती. या संदर्भात पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी एहसान जाफरी यांच्या पत्नी झकिया जाफरी यांनी केली होती.
 
झकिया जाफरी यांच्या या कायदेशीर लढाईत तीस्ता सेटलवाड सहयाचिकाकर्ता आहेत.
 
झकिया जाफरी यांच्या तक्रारीमागे तीस्ता सेटलवाड यांचा हस्तक्षेप असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांचं म्हणणं आहे.