1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 4 मार्च 2023 (16:10 IST)

अपहरणानंतर दिवसभर मिरच्या खाऊ घातल्या, एकाचा मृत्यू, आरोपींना अटक

“मी आणि माझे भाऊजी आमच्या भंगार दुकानात बसलो होतो, अचानक दोन व्यक्ती महागड्या गाडीमधून आमच्याकडे आल्या. त्यांनी आमचं अपहरण केलं. नकली बॅटरी विकण्याच्या आरोपांखाली त्यांनी आम्हाला जबर मारहाण केली. इतकंच नव्हे तर त्यांनी आम्हाला जबरदस्तीने मिरच्या खाऊ घातल्या. तोंडात मिरच्या कोंबून आम्हाला मारहाण करण्यात आली. नंतर माझे भाऊजी सतत पाणी मागत होते, पण अखेरीस बेशुद्ध पडले.
 
भाऊजी बेशुद्ध पडल्यानंतर त्या लोकांनी त्यांना कुठेतरी नेलं. पण नंतर मला सोडून दिलं तेव्हा मी पाहिलं तर बाहेर भाऊजी मरून पडले होते.”
 
वडोदऱ्यात भंगार व्यवसाय करणारे कैलासनाथ योगी सांगत होते. ते आणि त्यांच्या बहिणीचे पती राजूनाथ हे दोघे मिळून हा व्यवसाय चालवत असत.
 
मूळचे राजस्थानच्या भिलवाडातील मियाला गावचे रहिवासी असलेल्या कैलासनाथ यांना शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं.
 
कैलासनाथांचे भाऊजी राजूनाथ हे वडोदरामध्ये छानी परिसरात भंगार व्यवसाय करायचे. कैलासनाथ यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने राजूनाथ यांनी त्यांना वडोदराला बोलावून घेतलं. यानंतर दोघे मिळून येथील भंगार व्यवसाय करू लागले.
नेमकं काय घडलं?
वडोदराच्या सयाजीराव हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कैलासनाथ यांनी बीबीसीशी बोलताना आपल्यावर बेतलेला प्रसंग समजावून सांगितला.
 
ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी राजू भारवाड आणि बेचर भारवाड नामक दोन व्यक्तींनी आमच्याकडून SUV गाडीच्या दोन बॅटरी विकत घेतल्या होत्या. पण ते काही दिवसांनंतर पुन्हा आमच्या दुकानी आले. तुम्ही चोरीच्या बॅटरी विकत आहात, वरून दहापट पैसे घेत आहात, असं म्हणत त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर त्यांनी आम्हाला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं. त्यानंतर अजवानामधील निमेता रोडवरच्या फार्महाऊसमध्ये आम्हाला नेण्यात आलं. तिथेही पुन्हा आम्हाला मारहाण करण्यात आली."
 
कैलासनाथ सांगतात, “आम्हाला जोरदार मारहाण करूनही त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी आमच्या तोंडात मिरच्या कोंबून आम्हाला त्या खाण्यास सांगितलं. त्याशिवाय, याच मिरच्या आम्हाला एकमेकांना भरवण्यासही सांगण्यात आलं.
 
या मिरच्या खाल्यापासूनच माझ्या भाऊजींची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली. भाऊजी त्यांना सतत पाणी मागत होते. पण राजी आणि बेचर यांनी ते नाटक असल्याचं म्हणत त्याकडे दुर्लक्ष केलं.
 
त्यांनी आम्हाला मिरच्या खाऊ घालणं सुरू ठेवलं. सकाळपासून दुपारपर्यंत मारहाण, मिरच्या खाणं आणि पुन्हा मारहाण सुरूच होती.
 
संध्याकाळी सातच्या सुमारास भाऊजींची तब्येत बिघडू लागली. ते बेशुद्ध पडले. त्यानंतर दोघे आले. त्यांनी भाऊजींना एका गाडीत बसवून कुठेतरी घेऊन गेले.
 
भाऊजी कुठे आहेत, हे मी त्यांना वारंवार विचारत होतो. पण त्यांनी मला त्याविषयी सांगितलं नाही. आम्ही त्याला रुग्णालयात दाखल करू, असं ते म्हणाले.
 
तोपर्यंत मीसुद्धा अर्धमेल्या अवस्थेत आलो होतो. माझ्या भाऊजींना हलोलजवळ कुठेतरी नेलं इतकंच मला धुसर माहिती आहे.
 
कैलाशनाथच्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी त्याला वापी हायवेजवळ एका ठिकाणी रस्त्यावर सोडून देण्यात आलं. त्याने घातलेली सोन्याची अंगठी आणि मोबाईल परत करण्यात आला.
 
कैलाशनाथ पुढे सांगतात, “त्यांनी मला 1300 रुपये दिले. आता तू मुंबईला निघून जा. इथे काय घडलं ते कुणालाच सांगू नको, अन्यथा तुझ्या सगळ्या नातेवाईकांना मारून टाकू, अशी धमकीही त्यांनी दिली.
 
मी वापीवरून सुरतला आलो आणि माझ्या भावाचा शोध घेतला. मी रुग्णालयात दाखल झालो तेव्हा मला कळलं की हलोलमध्ये माझ्या भाऊजींचा मृतदेह आढळून आला आहे.”
 
जास्त मिरच्या खाल्याने मृत्यू होतो का?
वडोदराच्या हरणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. आर. वेकारिया यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना या घटनेबाबत अधिक माहिती दिली.
 
ते म्हणाले. “बॅटरी विकण्याच्या कारणावरून कैलाशनाथ आणि राजूनाथ यांना मारहाण केल्याबाबतची तक्रार आम्हाला मिळाली आहे. या प्रकरणात राजूनाथ यांचा मृतदेह आम्हाला हलोलमध्ये सापडला. दोन्ही आरोपी वडोदऱ्यावरून मुंबईला पळून गेले होते. पण आम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात यश मिळवलं आहे.
 
पोलीस निरीक्षक वेकारिया पुढे म्हणाले, “राजूनाथ यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येत आहे. यातून त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समजू शकेल. मिरच्या जास्त खाल्ल्याने राजूनाथ बेशुद्ध पडले होते आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला, असं कैलाशनाथ यांचं म्हणणं आहे. या दिशेने तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अधिक माहिती समजू शकणार आहे.
 
मिरच्या जास्त खाल्ल्याने यापूर्वी कुणी अशाप्रकारे मृत्यूमुखी पडलं आहे का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बीबीसी गुजरातीने अहमदाबाद मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. मुकेश माहेश्वरी यांच्याशी संपर्क साधला.
 
डॉ. माहेश्वरी म्हणाले, “मिरच्यांच्या अधिकच्या सेवनाने कुणी मृत्यूमुखी पडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पण मिरच्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर डायरिया होण्याची शक्यता असते. किंवा डी-हायड्रेशनच्या समस्येकडेही दुर्लक्ष करता येत नाही.”
 
शल्यचिकित्सक डॉ. राजेश शाह यांच्या मते, “जास्त मिरच्या खाल्यानंतर व्यक्तीच्या पोटात असिडीटीचं प्रमाण खूप वाढतं. पोटाची आतील भागातील त्वचा ही अत्यंत संवेदनशील असते. पित्ताचा त्रास असलेल्या, अल्सर आजार असलेल्या व्यक्तीने जास्त मिरच्या खाल्या तर त्यांच्या पोटात रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. अशा प्रकरणांमध्ये ती व्यक्ती बेशुद्ध पडते. वेळीच उपचार झाले नाहीत, तर त्यांचा मृत्यूही ओढावू शकतो.”
 
या प्रकरणातील दोन्ही आरोपी, राजू भारवाड आणि बेचर भारवाड हे वडोदराच्या खोडियारनगरचे रहिवासी आहेत. दोघेही मालधारी ट्रान्सपोर्ट कंपनी पार्टनरशिपमध्ये चालवतात.
 
बीबीसीने त्यांच्यावरील आरोपांबाबत त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या बाजूने कुणीही काहीही बोलण्यास तयार नाही.
 
Published By- Priya Dixit