बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (22:20 IST)

'या' प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नाहीत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आपल्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असं त्यांनी आयोगाला सांगितलंय. आयोगाच्या सुनावणीत परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पुष्टी त्यांच्या वकिलाने बुधवारी केली.
 
या वर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करूनही, ते आतापर्यंत हजर झालेले नाही. आयोगाने परमबीर सिंग यांना तीनदा दंड ठोठावला होता. जून महिन्यात ५ हजार आणि इतर दोनदा गैरहजर राहिल्याबद्दल प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावला होता.
 
या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी चौकशी आयोगासमोर हजेरी लावली. ते म्हणाले, “परमबीर सिंग यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राव्यतिरिक्त या प्रकरणात आणखी कोणतेही पुरावे देण्यास नकार दिला आहे. तसेच सिंग उलट तपासणीसाठीही तयार नाही,” असे शिशिर हिरे यांनी सांगितले.