शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (11:50 IST)

विहिरीवर पूजापाठ करताना स्लॅब कोसळ्याने 13 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान विहीरीचा स्लॅब कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 महिला आणि 11 मुलींचा समावेश आहे.
 
कुशीनगरातल्या नौरंगिया टोला गावात ही दुर्दैवी घटना घडली.
 
लग्नसोहळ्यासाठी जमलेल्या गावातल्या लोकांपैकी काही जण विहीरीच्या स्लॅबवर बसलेले होते. लोकांच्या वजनाने विहीरीचा स्लॅब कोसळला आणि त्यावर बसलेले लोक विहीरत कोसळले. यामुळे 13 जणींचा मृत्यू झालाय.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका ट्वीटद्वारे या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय.
 
पंतप्रधान मोदींनी म्हटलंय, "उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमधली घटना हृदयद्रावक आहे. यामध्ये ज्या लोकांचा जीव गेलाय त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी सहवेदना व्यक्त करतो. सोबतच जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना. स्थानिक प्रशासन शक्य ती सगळी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत केली जाईल.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्वीट करत दुःख व्यक्त केलंय.
 
"जनपद कुशीनगरमधल्या नौरंगिया स्कूल टोला गावातल्या दुर्दैवी घटनेत झालेले गावकऱ्यांचे मृत्यू अत्यंत दुःखद आहेत. मृतांच्या शोकाकूल कुटुंबियांसाठी मी सहवेदना व्यक्त करतो."
 
कुशीनगरचे जिल्हाधिकारी एस. राजलिंगम यांचा दाखला देत ANI वृत्तसंस्थेने म्हटलंय, "नौरंगिया टोला गावात एक जुनी विहीर होती जी स्लॅब घालून झाकण्यात आली होती. पूजापाठ सुरू असताना मुलं आणि महिला त्यावर बसल्या होत्या. या दरम्यान स्लॅब खाली कोसळला आणि या लोकांच्या अंगावर ढीग कोसळला."
 
रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. अंधार असल्याने मदत आणि बचाव कार्यात अडथळा येत होता. अॅम्ब्युलन्स उशीरा पोहोचल्याची तक्रारही काही गावकऱ्यांनी केलीय.
 
मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा कुशीनगरचे जिल्हाधिकारी एस. राजलिंगम यांनी केलीय.