हळदी समारंभात विहिरीत पडून 13 महिलांचा मृत्यू
कुशीनगर : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरात विहिरीत पडल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये मुली आणि महिलांचा समावेश आहे. सुमारे दीड डझन महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार लग्न समारंभात हळदीच्या दिवशी मटकोडवाच्या विधीसाठी महिला आणि मुली पोहोचल्या होत्या. नौरंगिया गावात हा अपघात झाला. आतापर्यंत 13 मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळापासून रुग्णालयाचे अंतर अवघे 3 किलोमीटर असताना तब्बल दीड तास दहा कॉल करूनही एकही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते. अपघातानंतर ग्रामस्थांनी टॉर्चच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टरांचे पथक उपस्थित आहे.
अपघात कसा झाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नौरंगिया ग्रामसभेच्या शाळेत महिला व मुली एका मांगलिक कार्यक्रमात विहिरीच्या पूजनाच्या विधीसाठी जमल्या होत्या. विहीर पाण्याने भरलेली होती. गर्दी जास्त होती. विहिरीच्या तळावर आणि विहिरीवर बांधलेल्या मचाणावर मुली व महिला बसल्या होत्या. विहिरीचा प्लॅटफॉर्म कमकुवत झाल्याने ती तुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मुली व महिला विहिरीत पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी अनेक महिला विहिरीतही गेल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला लग्नाच्या एक दिवस आधी माती दळण्याचा विधी करण्यासाठी विहिरीजवळ पोहोचल्या होत्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर 11 मुली आणि दोन महिलांना विहिरीतून बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. अधिकाधिक लोकांना विहिरीतून बाहेर काढण्यात जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी व्यस्त आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विहिरीत आणखी लोक अडकल्याचे वृत्त आहे. बचावकार्य सुरू आहे. कुशीनगरच्या डीएमने या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.