शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (14:52 IST)

शिवसेना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 50 ते 60 उमेदवार उभे करणार

शिवसेनेने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 50 ते 60 उमेदवार उभे केले आहेत. तसेच विधानसभेची निवडणूक संपताच आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागणार आहोत. उत्तर प्रदेशात आम्ही लोकसभा निवडणुकीत 15 ते 20 उमेदवार देणार आहोत. संपूर्ण देशात शिवसेना लोकसभेच्या 100 जागा लढवणार आहोत. त्यात यूपीतील 20 जागा असतील असं शिवसेना नेते संजय राऊत  यांनी स्पष्ट केलं. शिवसेना नेते संजय राऊत उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. 
 
यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेशातील निवडणूक महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशातील निकालाने देशाची दिशा आणि दशा दाखवली जाते. त्यामुळे संपूर्ण देश उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे पाहत आहे. मी आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात आलो आहे. उत्तर प्रदेश ही देशातील सर्वात मोठी विधानसभा आहे. याच राज्यातून पंतप्रधान निवडून येतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही 50 ते 60 उमेदवार आम्ही उभे केले आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 15 उमेदवार रिंगणात आहेत. पाचव्या आणि सातव्या टप्प्यात 30 उमेदवार उभे करणार आहोत, असं राऊत म्हणाले.
 
430 विधानसभा जागा असलेल्या राज्यात 50 ते 60 उमेदवारांनी लढणं ही मोठी गोष्ट नाही. पण आम्ही गंभीरपणे लढू. आमची कोणत्याही मोठ्या पक्षाशी युती केली नाही. आम्ही किसान रक्षा पार्टी, करणी सेना, अवध केसरी सेना आणि इतर छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे. विधानसभा निवडणूक संपताच आम्ही लोकसभेच्या तयारीला लागणार आहोत. उत्तर प्रदेशात आम्ही लोकसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार आहोत. त्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही 100 च्या आसपास जागा लढवणार आहोत. दादरा नगर हवेली हा भाजपचा गड होता. यावेळी शिवसेनेने ही लोकसभा जागा जिंकली आहे. गुजरातला लागूनच हा मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्ही दक्षिण गुजरातेत जाऊन निवडणूक लढणार आहोत. संपूर्ण देशात निवडणुका लढवू. पण उत्तर प्रदेशातून सुरुवात करू, असं त्यांनी सांगितलं.