अशी होणार सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा
सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा येत्या मंगळवारपासून म्हणजेच 26 एप्रिलपासून होणार आहे. दरवर्षी एकदाच होणाऱ्या सीबीएसईची परीक्षा यावेळी दोन सत्रात होत आहेत. कोरोना महामारीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरु होईल. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं पार पडणार आहे.
याआधी सीबीएसईची पहिल्या सत्राची परीक्षा झाली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या सत्रातील परिक्षा येत्या मंगळवार पासून सुरु होईल. दरम्यान, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीटाचे वाटपही करण्यात आलं आहे. दहावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरपर्यंत तर बारावीची परीक्षा जूनपर्यंत चालणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्रात होणारी सीबीएससीची परीक्षा हे शाळेऐवजी अन्य परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य परिस्थिती घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांप्रमाणे परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हजेरी लावावी लागणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतली जाणारी दहावीची परीक्षा 24 मे पर्यंत चालणार आहे. तर बारावी परीक्षेचा शेवटचा पेपर हा 15 जून रोजी होईल. कोरोना महामारी आधी सीबीएसई बोर्डाची परीक्षा फक्त एकाच सत्रात होत होती. मात्र कोरोनामुळे ही परीक्षा दोन सत्रात घेतली जातेय.