सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मे 2018 (09:37 IST)

उत्तर प्रदेश, राजस्थानात धुळीचे वादळ, १०९ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश, राजस्थानात ताशी १०० ते १२० कि.मी. वेगाने आलेल्या धुळीच्या वादळाने हाहाकार माजविला. या वादळात १०९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो घरे कोसळली आणि हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. शेकडो जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन राज्यांतील वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली. वीज खांब कोसळल्यामुळे अंधाराचे साम्राज्य आहे. धुळीच्या वादळाने उत्तर प्रदेशातील किमान १७ जिल्हय़ांत हाहाकार माजविला. तब्बल ताशी १२० कि.मी. वेगाने घोंघावणाऱ्या या वादळात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने आणखी भीषण स्थिती निर्माण झाली. राजस्थानातील तीन जिल्हय़ांत प्रचंड हानी झाली.
 
उत्तर प्रदेशात आग्रा जिल्हय़ात सर्वाधिक ४३ जणांचा मृत्यू झाला. १७ जिल्हय़ांमध्ये हाहाकार माजला. यामध्ये बिजनौर, बरेली, सहारणपूर, पीलभीत, चित्रकूट, रायबरेली, उन्नाव, मथुरा, अमरोहा, कनौज, बांदा, कानपूर, सीतापूर, संभल, मिर्जापूरचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ७३ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानात ३८, बिहार आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी दोनजण ठार झाले आहेत. राजस्थानात भरतपूर, छौलपूर आणि अल्वर जिल्हय़ात सर्वात जास्त हानी झाली. भरतपूरमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. धुळीच्या वादळात अनेक गाडय़ांवर झाडे कोसळली. शेकडो गाडय़ांचे नुकसान झाले. वादळ आणि पावसामुळे पारा घसरल्याने तापमानात घट झाली. राजस्थानात वाळूचे तर उत्तर प्रदेशात धुळीचे वादळ असे चित्र पाहायला मिळाले.