रविवार, 3 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 25 सप्टेंबर 2022 (17:19 IST)

उत्तराखंड : अंकिता भंडारीच्या हत्येनंतर नागरिकांनी रोखून धरला महामार्ग

अंकिता भंडारीच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी रविवारी (25 सप्टेंबर) बद्रीनाथ-ऋषिकेश महामार्ग रोखून धरला आहे. अंकिताच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सार्वजनिक करावा आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त लोकांची मागणी आहे. असं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
 
या वृत्तानुसार, प्रशासन महामार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, अंकिताच्या अंत्यसंस्काराच्या आधी रविवारी श्रीनगरमधील दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत.
 
तत्पूर्वी, अंकिताच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन अहवालाची मागणी करत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. मात्र, प्रशासन अंकिताच्या कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.
अंकिता भंडारीचा भाऊ अजय सिंह भंडारी यांनी म्हटलं, "आम्ही प्रोव्हिजनल रिपोर्ट पाहिला आहे, ज्यामध्ये अंकिताला मारहाण केल्यानंतर नदीत फेकण्यात आल्याचं म्हटलं आहे. मात्र, आम्ही अंतिम रिपोर्टची वाट पाहत आहोत."
 
प्रकरण काय?
उत्तराखंडमध्ये एका रेसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणाने सध्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकरणात उत्तराखंड पोलिसांनी भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकीत आर्य याला अटक केली आहे. अंकिता गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर, काल तिचा मृतदेह (शनिवार, 24 सप्टेंबर) पोलिसांनी शोधून काढला. ऋषिकेश येथील चिला कालव्यात अंकिता भंडारीचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे.
 
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून अंकिताच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं. या प्रकरणाशी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं ते म्हणाले.
 
मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, "आज सकाळी अंकिता भंडारीचं मृतदेह शोधण्यात आला. या हृदयद्रावक घटनेने मी अत्यंत दुःखी झालो आहे. दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या हेतूने पोलीस उपमहानिरीक्षक पी. रेणुका देवी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT नेमण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. आरोपींच्या बेकायदेशीर रेसॉर्टवर बुलडोझर चालवण्याची कारवाईही काल करण्यात आली."
 
सहा दिवसांनंतर सापडला मृतदेह
अंकिता हत्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी (23 सप्टेंबर) पुलकीत आर्य, मॅनेजर सौरभ भास्कर आणि असिस्टंट मॅनेजर अंकित गुप्ता यांना अटक केली आहे.
 
चौकशीत दोघांनी सांगितलं की हत्येनंतर त्यांनी अंकिताचा मृतदेह चिला कालव्यात फेकून दिला होता.
सहायक पोलीस अधीक्षक शेखर चंद्र सुयाल यांनी सांगितलं की सुरुवातीच्या चौकशीत आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण धाक दाखवल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.
गेल्या सोमवारी अंकिता बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर नातेवाईकांनी यासंदर्भात तक्रार पोलिसांत दाखल केली होती.
 
पुलकीत आर्यचे वडील विनोद आर्य हे भाजप सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. ते उत्तराखंड माटी कला बोर्डचे अध्यक्षही होते. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या रेसॉर्टच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत. बेकायदेशीर पद्धतीने चालणाऱ्या रेसॉर्टवर कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
 
पुलकीत आर्य हा पौडी जिल्ह्यात यमकेश्वर येथे हा रेसॉर्ट चालवायचा. याच ठिकाणी शुक्रवारी बुलडोझर कारवाई करण्यात आली. दरम्यान भाजपने विनोद आर्य यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पीटीआय ने ही बातमी दिली आहे.