रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (17:31 IST)

Uttarkashi Tunnel Tragedy मजुरांना बाहेर काढण्यासाठी आणखी वेळ लागणार, सध्या तिथं काय घडतंय?

uttarkashi tunnel
Uttarkashi Tunnel Tragedy उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू असून त्यांना लवकरच बाहेर काढले जाईल अशी आशा व्यक्त केली जातेय.
 
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं की, बोगद्यात अडकलेल्या मजुरांना काढण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा मशीन मागवले आहे.
 
शनिवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत हे मशीन वापरले जाण्याची शक्यता आहे.
 
ते म्हणाले की, ऑगर मशीन तुटल्यानंतर प्लाझ्मा मशीनद्वारे ड्रिलिंग केले जाईल. त्याद्वारे एका तासात चार मीटपर्यंत खोदकाम करता येते.
 
प्लाझ्मा मशीनद्वारे काम सुरू केल्यानंतर मजुरांना काही तासांमध्ये बाहेर काढले जाईल, असा दावा त्यांनी केला.
 
धामी यांच्या मते, बोगद्यातील मजुरांना काढण्यासाठी सर्व पर्यायांवर काम केलं जात आहे. त्यासाठी व्हर्टिकल ड्रिलिंगचं कामही सुरू करण्यात आलं आहे.
 
हे ऑपरेशन लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी इच्छा असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानही याबाबत काळजीत आहेत.
 
"केंद्रीय संस्था, राज्य सरकार आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची पथकं मजुरांना बाहेर काढण्याच्या या मोहिमेत एकत्रितपणे काम करत आहेत. आम्ही लवकरच यशस्वीरित्या सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळवू," असं धामी म्हणाले.
 
मुख्यमंत्री धामी यांनी दिलेल्या माहितीनुसार , त्याठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. पण तरी गरज लागेल ते लगेचच मागवले जात आहे.
 
वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, बोगद्याच्या बाहेर काही अंतरावरच 10 बेडचे हॉस्पिटल, 40 अॅम्ब्युलन्स, 20 डॉक्टर आणि 35-40 सपोर्ट स्टाफ सज्ज आहेत. तर सुमारे 50 किलोमीटर अंतरावर 41 बेडचं एक रुग्णालय तयार करण्यात आलं आहे.
 
बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी सुरू असलेल्या मदतकार्याचा शनिवार (25 नोव्हेंबर) हा 14 वा दिवस आहे.
 
शनिवारी (25 नोव्हेंबर) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद हसनैन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, "उत्तरकाशी बोगद्यातून 41 कामगारांना काढायला आणखी किती वेळ लागेल हे ठामपणे सांगता येणार नाही. हिमालयातला डोंगर फोडताना अनेक अडचणी येतात. जसं युद्ध सुरू झाल्यावर ते कधी संपेल हे सांगता येत नाही. तसंच हे काम आहे. "
 
त्याआधी मदतकार्याच्या 12 व्या दिवशीच कामगारांपर्यंत पोहोचू असं सरकारने सांगितलं होतं. पण मार्गात काही अडथळे आल्याने कामाचा वेग मंदावला.
 
12 नोव्हेंबर रोजी बोगदा कोसळल्याने 41 मजूर त्यात अडकले आहेत. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.