मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (07:57 IST)

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

malini rajurkar
हैदराबाद – ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे आज निधन झाले आहे. ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायका आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या मालिनी राजूरकर यांनी 82व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
 
मालिनी राजूरकर यांचा जन्म 8 जानेवारी 1941 रोजी अजमेर येथे झाला. त्या तीन वर्षे अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमध्ये गणित शिकवल्या. तिथेच त्यांनी गणित या विषयात पदवी घेतली. अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर वसंतराव राजूरकर यांच्यासोबत मालिनी यांनी विवाह केला.
 
मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवात त्यांची कला सादर केली. गुणीदास संमेलन (मुंबई), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) आणि शंकर लाल महोत्सव (दिल्ली) या संगीत महोत्सवांमध्ये मालिनी राजूरकर यांनी त्यांची कला सादर केली.
मालिनीताईंचे टप्पा आणि तराना या गायकीवर विशेष प्रभुत्व होते. “नरवर कृष्णासमान’ आणि “पांडू-नृपती जनक जया’ ही त्यांनी गायलेली दोन मराठी नाट्यगीते लोकप्रिय ठरली.
 
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनीताई राजूरकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई:- “ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनीताई राजूरकर हे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्वं होतं. देशविदेशात त्यांचे चाहते होते. मुंबईत गुणीदास संमेलनाच्या, पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवासारख्या संगीत कार्यक्रमातली त्यांची उपस्थिती संगीत रसिकांचं मन जिंकून घेत असे. महाराष्ट्राबाहेर राहूनही महाराष्ट्राशी नातं सांगणाऱ्या या मराठमोळ्या नावानं कोट्यवधी रसिकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य केलं.
 
संगीत नाटक अकादमी, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं सन्मानित मालिनीताई राजूरकरांचं निधन हा कोट्यवधी संगीत रसिकांसाठी मोठा धक्का, भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी आहे. मी मालिनीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालिनीताई राजूरकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.