1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (11:15 IST)

या गावात माकडांच्या टोळक्याने असं काय केलं? की त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला

monkey
"माझा 10 वर्षांचा मुलगा आमच्या गावातील शाळेच्या मैदानात खेळत होता. त्यावेळी माकडांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचं पोट फाडलं. त्याची आतडी बाहेर आली. हातात आतडं घेऊन तो घरी आला आणि लगेचच कोसळला. हे दृश्य आम्ही पाहिलं.आम्ही त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं पण त्याला वाचवता आलं नाही."
 
असे धक्कादायक आणि धीर देणारे शब्द आहेत दीपक ठाकोर याचे वडील महेश ठाकोर यांचे.
 
माकडांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात 10 वर्षीय दीपकचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलासोबत घडलेल्या घटनेनं माकडांचा त्रास आणि हल्ल्यांबाबत जनमानसात चिंता निर्माण झाली आहे.
 
गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये माकडं मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक भागात त्यांनी लोकांवर हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत.
 
मात्र देहगामची ही घटना अधिक धक्कादायक आहे. देहगाम हे गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यात आहे.
 
त्यावेळी काय झालं?
देहगामपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या साल्की गावाची लोकसंख्या अंदाजे सात हजार आहे.
 
या गावातील लोक वारंवार माकडांच्या हल्ल्यानं हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून इथं माकडांच्या हल्ल्यामुळे सहाहून अधिक जण जखमी झाले आहेत.
 
तर 13 नोव्हेंबर 2023 रोजी दीपकचाही माकडाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
 
सध्या गांधीनगर जिल्ह्यातील वनविभागाची पथकं या गावातून माकडांना पकडत आहेत, मात्र एका बालकाच्या मृत्यूनंतर वनविभागाची कारवाई सुरु झाल्यानं त्यांच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे.
 
माकडांच्या त्रासाबाबत वारंवार निवेदनं आणि तक्रारी करूनही वेळीच उपाययोजना न झाल्यानं दीपकचा बळी गेल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.
 
दीपक ठाकोर याचे वडील महेश ठाकोर यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "दिवाळीनंतरचा 13 तारखेचा दिवस होता. त्या दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास माझा मुलगा आमच्या गावातील शाळेच्या मैदानात इतर मुलांसोबत खेळत होता. त्यावेळी एक माकडांच्या टोळक्याने माझ्या मुलावर हल्ला केला. त्याचं पोट फाडून आतडं बाहेर काढलं. या घटनेनंतर अचानक माझा मुलगा आतडं हातात धरून रडत रडत आला. तो जोरात ओरडला बाबा....आम्ही लगेच पाहिलं. त्याच्या हातात आतडं होतं.. तो प्रचंड रडत होता. त्याची अवस्था पाहून आम्हाला धक्काच बसला, पण लगेचच आम्ही त्याला खासगी रुग्णालयात नेलं. त्यानंतर आम्ही त्याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. तिथं माझ्या मुलाला मृत घोषित करण्यात आलं."
 
रडतरडत ते पुढे म्हणाले की, "ज्या क्षणी आमच्या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं, त्या क्षणी वाटलं की आमचं सर्व आयुष्यच लुटलं गेलंय. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. माझा मुलगा खूप हुशार होता. हा सण असा शोकमग्न काळात बदलेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून आमच्या गावात माकडांचा त्रास सुरू आहे. याबाबत आम्ही वनविभागाला कळविलं आहे. आमच्या गावात वेगवेगळ्या वेळी पाच-सहा लोकांवर माकडांनी हल्ले केले, पण माकडांच्या त्रासाचं निराकरण झालं नाही."
 
गावात माकडांचा उपद्रव वाढला आहे
या गावातील इतर लोकही माकडाच्या हल्ल्याचे बळी ठरले आहेत. इतर मुलांवरही माकडांनी हल्ला केला आहे. याच गावातील रहिवासी शैलेश ठाकोर यांचा पाच वर्षांचा मुलगा रुद्र ठाकोर याच्यावरही 30 ऑक्टोबर 2023 रोजी माकडांनी हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता.
 
याबाबत बीबीसी गुजरातीशी बोलताना शैलेश ठाकोर म्हणाले, "माझा मुलगा रुद्र पाच वर्षांचा आहे. माझा मुलगा अंगणात खेळत असताना माकडांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात त्याच्या मांडीला खूप गंभीर दुखापत झाली. माझा मुलाला आम्ही तातडीनं रुग्णालयात नेलं. त्याला रुग्णालयात 28 टाके घालावे लागले."
 
शैलेश ठाकोर पुढे सांगतात की, "मग आम्ही वन विभागाला माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक माकड पकडलं. अशा प्रकारच्या गंभीर घटना घडत आहेत. आमच्या गावातील बहुतेक लोक खूप घाबरलेले आहेत आणि मुलांना बाहेर खेळायला पाठवायला घाबरतात."
 
बीबीसी गुजरातीशी बोलताना साल्की गावचे उपसरपंच राजेश ठाकोर म्हणाले, "आमच्या गावात 100 हून अधिक माकडं आहेत. त्यापैकी 8 ते 10 माकडं हल्लेखोर आहेत. आम्ही याबाबत वनविभागाला यापूर्वी माहिती दिली होती."
 
"वनविभागाने पिंजरे लावून दोन माकडंही पकडली होती. पण तरीही त्यांची दहशत कमी झालेली नाही. गावातील पाच जणांवर माकडांनी हल्ला करून त्यांना जखमी केलं आहे."
 
ते पुढे म्हणाले, "माकडांनी 13 तारखेला 10 वर्षीय दीपकवर हल्ला केला. 10 वर्षीय मुलाच्या मृत्यूमुळे आमच्या गावात दिवाळीच्या सणात शोककळा पसरली आहे. संपूर्ण गावात शोककळा आहे. आमच्या गावात असा कोणीही नाही ज्यानं दिवाळी किंवा त्याबरोबरचे सण साजरे केले असतील."
 
"बालकावर झालेल्या हल्ल्यानंतर आताही वनविभागाचे कर्मचारी आमच्या गावात स्टँडबाय पिंजरे घेऊन उभे आहेत. आमच्या गावातील तरुणही त्यांना सहकार्य करत आहेत. या दोन दिवसांत एक माकड पकडण्यात आलं आहे."
 
खाद्यपदार्थ खात असलेल्या एका महिलेवरही माकडानं हल्ला केला आणि तिला सहा टाके पडले. तसंच, स्टोव्ह लावणाऱ्या महिलेवर माकडांनी हल्ला केला आणि तिचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले."
 
पोलिसांचं काय म्हणणं आहे?
बीबीसी गुजरातीशी बोलताना देहगाम पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि संपूर्ण घटनेचा तपास करणारे तपास अधिकारी निकुल म्हणाले, "साल्की गावातील दीपक ठाकोर या 10 वर्षांच्या मुलाचा माकडाच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला.अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून,आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. आम्ही गावातील इतर लोकांशी देखील बोलत आहोत आणि चौकशी करत आहोत ज्यांच्यावर माकडांनी हल्ला केल्याचं सांगण्यात आलं आहे."
 
गांधीनगर जिल्ह्यातील वनविभागाचे डीसीएफ चंद्रेश कुमार सनद्रे बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले, "देहगामच्या साल्की गावात एक मुलगा खेळत होता. माकडांच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. याआधी दहा दिवसांपूर्वी गावात माकडांनी हल्ला केल्याची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली होती. तेवढ्यात आमच्या विभागाची टीम पोहोचली आणि दोन माकडं पकडली. आताही आमची टीम गावात जाऊन माकडं पकडत आहे."
 
या संपूर्ण घटनेबद्दल काही गावकरी म्हणतात, "गावात माकडांची टोळी आहे, त्यातील काही हिंसक असतात आणि कोणत्याही व्यक्तीवर किंवा लहान मुलावर हल्ला करतात."
 
























Published By- Priya Dixit