कर्नाटक विधानसभेत भाजपला सर्वाधिक 104 जागा मिळाल्या, त्यानंतर काँग्रेसला 78, तर निजदला 38 जागा मिळाल्या. विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. मात्र, राज्यपाल वजुभाई वाला यांनी बुधवारी रात्री भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले. त्याविरोधात काँग्रेस आणि निजदने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी याप्रकरणी न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. भाजपच्या वतीने अॅड. मुकुल रोहतगी, काँग्रेसतर्फे अभिषेक मनु सिंघवी, निजदच्या वतीने कपिल सिब्बल आणि केंद्र सरकारतर्फे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.