शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :बंगळूर , गुरूवार, 17 मे 2018 (08:32 IST)

कर्नाटक: सरकार स्थापनेचे भाजपला निमंत्रण

कर्नाटकमधील राजकीय सस्पेन्स संपुष्टात आणताना राज्यपाल वजुभाई वाला यांनी आज रात्री भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानुसार भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बी.एस.येडियुरप्पा उद्या (गुरूवार) सकाळी 9 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपालांनी 75 वर्षीय येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.
 
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळता त्रिशंकूू स्थिती निर्माण झाली. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, कॉंग्रेस आणि जेडीएसने हातमिळवणी केल्याने मोठाच राजकीय पेच निर्माण झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर काल सायंकाळीच भाजप आणि कॉंग्रेस-जेडीएसने सरकार स्थापनेचे स्वतंत्र दावे केले. आजही कर्नाटकात वेगवान घडामोडी सुरूच होत्या. त्याचे केंद्रस्थान बंगळूर बनले. आजही राज्यपालांची भेट घेऊन दोन्ही बाजूंकडून सरकार स्थापनेचे दावे करण्यात आले. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर राज्यपालांनी भाजपला झुकते माप दिले.
 
राज्यपालांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस मुरलीधर राव यांनी रात्री पत्रकारांना दिली. आता उद्या येडियुरप्पा एकटेच शपथ घेणार आहेत. बहुमत सिद्ध केल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. वेगवान राजकीय घडामोडींनंतर अतिशय अल्प कालावधी उरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येडियुरप्पा यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसल्याचे समजते.

येडियुरप्पा आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
 
बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत