कर्नाटकात सत्ता संघर्ष शिगेला
जेडीएसचे दोन आमदार अचानक गायब झाले आहेत. आमदार राजा व्यंकटप्पा नायक आणि वेंकट राव नाडगौडा अशी त्यांची नावे आहेत. सध्या बेंगळुरू येथे सुरू असलेल्या जेडीएसच्या आमदारांच्या बैठकीत ते हजर राहणे अपेक्षित होते. आता त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. दरम्यान, पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत एचडी कुमारस्वामी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. जेडीएसचे नेते मंजूनाथ यांनी कुमारस्वामी आमचे मुख्यमंत्री असतील आणि काँग्रेसच्या साथीने आम्ही सरकार स्थापन करू असे म्हटले.
दुसरीकडे काँग्रेसचे सहा आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त काँग्रेसचे नेते एम बी पाटील यांनी फेटाळले असून आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे सांगितले आहे. उलट भाजपाचेच ६ आमदार आमच्या संपर्ककात असल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. पाटील यांच्या या दाव्याने कर्नाटकच्या राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे.