मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2023 (17:19 IST)

नरेंद्र मोदींनी भारताबद्दल परराष्ट्रात कोणकोणती विधानं केली आहेत?

काँग्रेस खासदार राहुल गांधी नुकतेच ब्रिटन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटीत इंडियन जर्नलिस्ट्स असोसिएशन आणि ब्रिटिश संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्सच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात भाषण केलं.
 
राहुल गांधी यांनी या भाषणांमध्ये भारतातील राजकीय स्थिती आणि परराष्ट्र धोरण या विषयांवर आपले विचार मांडले.
 
पण राहुल गांधी यांच्या भाषणावरून भारतात मात्र चांगलाच गदारोळ माजल्याचं दिसून येत आहे.
 
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी यावरून राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
 
कर्नाटकातील हुबळीमध्ये एका प्रकल्पाचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यावर नाव न घेता टीका केली.
 
ते म्हणाले, “काही जण लंडनमध्ये जाऊन भारतीय लोकशाहीवर टीका करत आहेत.”
 
केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधी यांनी युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच राज्यांचा संघ असल्याचं म्हटलं. ते पुढे म्हणाले की भारताचं संविधान संघराज्य पद्धतीवर आधारित आहे.
 
सध्या भारतीय संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू आहे. एकीकडे विरोधी पक्षाने अदानी समूहाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.
 
दुसरीकडे सत्ताधारी पक्षानेही राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
 
या सगळ्या गदारोळात संसदेचं कामकाज मात्र ठप्प झालं आहे.
 
राहुल गांधी यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत म्हटलं की त्यांना संसदेत आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जात नाही.
 
त्याच्या उत्तरादाखल उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनीसुद्धा मेरठमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधींवर टीका केली. बोलू दिलं जात नाही, माईक बंद केला जातो, हे आरोप धनकड यांनी फेटाळून लावले.
 
ते म्हणाले, लोकशाहीच्या मंदिरात अपमान होऊ दिला जाणार नाही.
 
राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत बोलताना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं, “सरकारवर टीका म्हणजे देशावर टीका असं कधीच होत नाही.”
 
पंतप्रधान मोदी यांचे व्हीडिओ
तर कांग्रेस सोशल मीडिया प्रभारी सुप्रीया श्रीनेत यांच्यासह इतर नेत्यांनी आता नरेंद्र मोदींचे परदेशातील व्हीडिओ शेअर करण्यास सुरू केलं आहे.
 
यामध्ये मोदी हे आपल्या परदेश दौऱ्यांमध्ये भारताच्या पूर्वीच्या सरकारांवर टीकास्त्र सोडताना दिसून येतात.
 
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असताना नरेंद्र मोदी यांनी 13 मे 2013 रोजी भारतीय वंशाच्या अमेरिकन समुदायाशी संवाद साधला होता.
 
व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलताना त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. भारत हा कमकुवत नेत्यांचा देश आहे, असं त्यावेळी ते म्हणाले होते.
 
त्यांनी तत्कालीन युपीए सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावताना म्हटलं, “सरकारबद्दल लोकांचा विश्वास कमी झाला आहे.”
 
2015 साली भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी कॅनडाच्या टोरंटोमध्ये एक भाषण केलं. त्यावेळी तिथे त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यांमध्ये मागील सरकारांवर केलेल्या टीकेमुळे संसदेत गदारोळही झाला होता.
 
2015 साली 28 एप्रिल रोजी राज्यसभेतील गदारोळात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण दिलं होतं.
 
राज्यसभेत बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यातील बोलण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही.
 
त्याच दिवशी राज्यसभा सदस्य आणि काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी मोदींच्या टोरंटोतील भाषणाचा मुद्दा उपस्थित केला होता.
 
पूर्वी स्कॅम इंडिया होतं, आता स्किल इंडिया आहे, असं मोदींनी म्हटल्याचा उल्लेख करून आनंद शर्मा यांनी म्हटलं की चुका होऊ शकतात, पण देशाला स्कॅम संबोधता येणार नाही.
 
16 मे रोजी शांघायमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना मोदींनी म्हटलं होतं, एका वर्षापूर्वीपर्यंत ज्यांना लाज वाटायची, त्यांनासुद्धा आता भारतीय म्हणवून घेण्यास अभिमान वाटतो.”
 
गेल्या वर्षी मे महिन्यात मोदी युरोपीय देशांच्या दौऱ्यावर होते. 2 मे रोजी त्यांनी जर्मनीत बर्लिनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांसमोर भाष करताना पूर्वीच्या सरकारांवर टीका केली होती.
 
त्यांनी म्हटलं की 2014 पूर्वी भारतात वर्क इन प्रोग्रेसची स्थिती कायम असायची. पण गेल्या 8 वर्षांमध्ये भारताने विकासाची एक उंच भरारी घेणं सुरू केलं आहे.
 
2015 च्याच सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं, देशात भ्रष्टाचाराची संस्कृती निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांवर आरोप सहज लावले जातात.
 
संसदेत आणि बाहेर सुरू असलेल्या वादादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी 14 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी परदेशात दिलेल्या भाषणांचा उल्लेख केला.
 
पंतप्रधानांनी केलेली ही वक्तव्ये देशाचा अपमान ठरत नाही का, असा प्रश्न यावरून खर्गे यांनी उपस्थित केला आहे.
Published By -Smita Joshi