गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (15:43 IST)

जेव्हा हिमालयात अमेरिकेची 600 विमाने कोसळली होती

अरुणाचल प्रदेशमध्ये नुकतंच एका संग्रहालयाचं उद्धाटन झालं. दुसऱ्या महायुद्धात हिमालयात कोसळलेल्या विमानांचे अवशेष तिथे ठेवण्यात आले आहेत.2009 पासून भारत आणि अमेरिका अशा दोन्ही देशांच्या एका टीमने अरुणाचल प्रदेशमधील पर्वतांमध्ये एक शोध मोहीम राबवली. या मोहिमेत 80 वर्षांपूर्वी कोसळलेल्या शेकडो विमानांचे अवशेष सापडले.
 
अमेरिकेची सुमारे 600 मालवाहू विमाने हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात कोसळल्याचा अंदाज आहे. यामध्ये किमान दीड हजार एअरमेन आणि प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.
 
भारतात दुसऱ्या महायुद्धाच्या घडामोडी तब्बल 42 महिने चालू होत्या. तेव्हाच ही विमाने कोसळली होती.
 
मृतांमध्ये अमेरिकन आणि चिनी वैमानिक, रेडिओ ऑपरेटर आणि सैनिकांचा समावेश होता.
 
आसाम आणि बंगालमधून चीनमधील सैन्याला युद्ध सामुग्री पुरवली जायची. त्यावेळी या विमानांचा हवाईमार्ग हिमालयाच्या उंच डोंगररांगातून जायचा.
 
एका बाजूला जर्मनी, इटली, जपान आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीन यांच्यातील दुसरं महायुद्ध भारताच्या ईशान्य प्रदेशात पोहोचलं होतं.
 
तो असा काळ होता, जेव्हा भारताच्या सीमेवर जपानी सैन्याने आगेकूच केली होती.
 
त्यानंतर हिमालयावरील हा हवाईमार्ग मित्र राष्ट्रांसाठी लाईफलाईन बनला होता. कारण त्यावेळी त्यांच्यासाठी म्यानमारचा भूमार्ग बंद झाला होता.
 
एप्रिल 1942 पासून अमेरिकेने लष्करी कारवाई सुरू केली.
 
या दरम्यान विमानांच्या मदतीने तब्बल 6 लाख 50 हजार टन युद्धसामग्रीची यशस्वीपणे वाहतूक केली.
 
मित्र राष्ट्रांना विजय मिळवण्यात या सामग्रींचा मोठा हातभार लागला होता.
 
वैमानिकांनी या धोकादायक हवाई मार्गाला 'द हंप' असं नाव दिलं होतं.
 
जो पूर्व हिमालयाच्या मुख्यत: आजच्या अरुणाचल प्रदेशातून चीनकडे जायचा. तो जगातील अत्यंत धोकादायक हवाईमार्ग मानला जायचा.
 
गेल्या 14 वर्षांपासून म्यानमार आणि चीनच्या सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशात भारत आणि अमेरिकेतील गिर्यारोहक, विद्यार्थी, डॉक्टर्स, फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने घनदाट जंगलात शोधमोहीम राबवली.
यामध्ये US डिफेन्स POW/MIA अकाउंटिंग एजन्सी (डीपीएए) च्या सदस्यांचाही समावेश होता. अमेरिकेची ही संस्था युद्धात हरवलेल्या सैनिकांचा शोध घेते.
 
स्थानिक आदिवासींच्या मदतीने ही टीम काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर नेमक्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचली. तिथे कमीतकमी 20 विमाने आणि बेपत्ता झालेल्या अनेक एअरमनचे अवशेष सापडले.
 
ही एक आव्हानात्मक मोहीम होती. सहा दिवसांचा ट्रेक, दोन दिवसांच्या रस्त्याने प्रवास करून ही टीम एकाच अपघात स्थळाचा शोध घेऊ शकली.
 
या दरम्यान एका हिमवादळाचा तडाखा बसल्यानंतर ही टीम तीन आठवडे डोंगरात अडकून पडली होती.
 
"सपाट मैदानापासून ते पर्वतांपर्यंत हा एक आव्हानात्मक भूभाग आहे. इथलं हवामान ही एक मोठी समस्या होती. हिवाळ्याच्या आधी आणि शरद ऋतुच्या शेवटीच आम्ही हे काम करू शकायचो,” असं या मोहिमांमध्ये सहभागी झालेले फॉरेन्सिक तज्ज्ञ विल्यम बेल्चर यांनी सांगितलं.
 
शोध मोहिमेत आणखी काय सापडलं?
या शोध मोहिमेत ऑक्सिजन टाक्या, मशीन गन, विमानांचे सांगाडे, कवटी, हाडे, शूज आणि घड्याळे सापडली आहेत.
 
सध्या या मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA नमुने घेतले आहेत.
 
एका गावकऱ्याकडून हरवलेल्या एअरमनचे ब्रेसलेट आणि तीक्ष्ण हत्यारांचे अवशेष घेण्यात आले.
 
काही क्रॅश साइट्सच्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी आधीच भेट दिली होती. त्यांनी तिथले अॅल्युमिनियमचे अवशेष भंगार म्हणून विकले आहेत.
 
पण आता हे अवशेष आणि त्यासोबतच्या आठवणींसाठी एक संग्रहालय बांधलं आहे.
 
हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या अरुणाचल प्रदेशातील एक निसर्गरम्य शहर पासीघाट या ठिकाणी हे संग्रहालय उघडलं आहे. त्याचं नाव आहे. ‘द हंप संग्रहालय’
भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी 29 नोव्हेंबर 2023 रोजी त्याचे उद्घाटन केले.
 
"ही केवळ अरुणाचल प्रदेश किंवा या अपघातग्रस्त कुटुंबांना भेट नाही. तर ही भारत आणि जगाला भेट आहे," असं संग्रहालयाचे संचालक ओकेन तायेंग यांनी म्हटलं.
 
ते पुढे म्हणाले, "या मिशनचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशातील सर्व स्थानिकांनाही यामुळे एक ओळख मिळाली आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे."
 
संग्रहालय या हवाई मार्गावरील उड्डाणाचे धोके स्पष्टपणे अधोरेखित करतं.
 
मेजर जनरल विल्यम टर्नर हे तेव्हा यूएस एअर फोर्सचे पायलट होते.
 
ते C-46 मालवाहू विमान चालवायचे. डोंगराचे तीव्र उतार, विस्तृत आणि खोल दऱ्या, अरुंद नाले आणि गडद तपकिरी नद्यांवरील गावांवरून विमान उडवल्याचं त्यांना स्पष्टपणे आठवतं.
 
या हवाईमार्गावर वैमानिकांना अतिशय तीव्र हवामानाचा सामना करावा लागायचा. या विमानांचे वैमानिक अनेकदा तरुण आणि नव्याने प्रशिक्षित असायचे.
टर्नर यांच्या म्हणण्यानुसार, द हंप मार्गावरील हवामान हे दर मिनिटाला आणि दर मैलाला बदलायचे.
 
एका बाजूला भारतातील जंगल असायचं. दुसऱ्या बाजूला पश्चिम चीनकडील पठार होते.
 
वादळात अडकलेली जड सामान वाहून नेणारी विमाने ताबडतोब 5 फूटांनी खाली यायची आणि तितक्याच वेगाने ती उंच भरारी पण घ्यायची.
 
एकदा वादळाचा सामना केल्यानंतर टर्नर यांनी त्यांचं विमान सुमारे 25 हजार फूट खाली आणलं होतं. तेव्हा त्यांचं विमान काही वेळासाठी उलटं झालं होतं.
 
त्याविषयी ते लिहितात, "वसंत ऋतूतील गडगडाटी वादळ, जोराचा वारा, गारवा आणि रपरप पडणाऱ्या गारा अशा परिस्थितीत विमाने नियंत्रित ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान होतं."
 
लाइफ मॅगझिनचे पत्रकार थिओडोर व्हाईट यांनी या संदर्भात स्टोरी लिहिण्यासाठी या हवाईमार्गावरून पाच वेळा प्रवास केला आहे.
 
ते लिहितात की पॅराशूट नसलेल्या चिनी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या एका विमानाच्या पायलटने त्याचे विमान जेव्हा बर्फाच्छादित झाले तेव्हा त्याने क्रॅश-लँड करण्याचा निर्णय घेतला.
 
सह-वैमानिक आणि रेडिओ ऑपरेटर यांनी मिळून ते उष्ण उष्णकटिबंधीय झाडांवर उतरण्यात यशस्वी झाले.
 
सुदैवाने ते विमान सुरक्षितपणे उतरले होते आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण ते लोक 15 दिवस भटकत राहिले. शेवटी दुर्गम खेड्यांतील लोकांनी त्यांना मदत केली.
 
इथल्या स्थानिकांनी अनेकदा अपघातातून वाचलेल्या जखमींना वाचवले आहे.
टर्नर सांगतात, एका वादळात नऊ विमाने कोसळली. त्यात 27 क्रू आणि प्रवासी ठार झाले.
 
"या हवाईमार्गावर वादळं एवढी तीव्र असायची की मी याआधी अशी परिस्थिती जगात इतरत्र कुठेच पाहिली नव्हती,” असं टर्नर सांगतात.
 
बेपत्ता एअरमेनच्या पालकांना असं वाटायचं की त्यांची मुले अजूनही जिवंत आहेत.
 
अशाच बेपत्ता एअरमन जोसेफ ड्युनावे यांची आई पर्ल ड्युनावे यांनी 1945 मध्ये एक कविता लिहिली.
 
"माझा मुलगा कुठे आहे? मला आणि जगाला जाणून घ्यायचंय. त्याचे ध्येय पूर्ण झाले का? की तो पृथ्वी सोडून गेला आहे? की तो जमिनीवर कुठेतरी आहे? की तो अजूनही भारताच्या जंगलात भटकत आहे?"
 
भारताच्या सीमेवर पोहोचलेल्या दुसऱ्या महायुद्धातील हे ऑपरेशन खरोखरच हवाई वाहतुकीतला एक धाडसी पराक्रम होता, असं मानलं जातं.
 
Published By- Priya Dixit