गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

रशियाने पाकिस्तानला विकलेली हेलिकॉप्टर्सची इंजिन्स परत मागितली कारण

जगाला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र विकणाऱ्या रशियाला कधीतरी स्वत:ला शस्त्रास्त्रांच्या टंचाईचा सामना करावा लागेल याची त्यांनी कल्पना देखील केली नसेल.
 
एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनविरुद्ध दीर्घकाळ युद्धात अडकलेल्या रशियावर अशी वेळ आलीय.
 
या संकटाचा सामना करण्यासाठी पुतिन यांना नाईलाजाने अनाकलनीय पावलं उचलावी लागतायत.
 
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात आपलं पारडं मजबूत ठेवण्यासाठी त्यांना पाकिस्तान, इजिप्त, ब्राझील आणि बेलारूस सारख्या देशांकडे मदतीचा हात मागावा लागेल, अशी रशियाची परिस्थिती आहे.
 
अहवालानुसार, रशियाने या देशांना विकलेल्या त्यांच्या फायटर आणि कार्गो हेलिकॉप्टरची इंजिन्स परत करण्यास सांगितलंय.
 
खरंतर, जेव्हापासून रशियाने या युद्धाला तोंड फोडलं तेव्हापासून हेलिकॉप्टर त्यांच्या लष्करी कारवाईचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पण युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत रशियाला शंभरहून अधिक हेलिकॉप्टर गमवावी लागली.
 
अशा परिस्थितीत एकीकडे रशियाने हेलिकॉप्टर इंजिन आणि सुट्या भागांचं उत्पादन वेगाने वाढवलं, तर दुसरीकडे इतर देशांकडून हेलिकॉप्टरर्स आणि सुटे भाग आणण्याची नामुष्कीदेखील त्यांच्यावर ओढवलेय.
 
अहवालानुसार, रशियाला भारत आणि अर्मेनियासारख्या देशांना विकल्या जाणार्‍या शस्त्रास्त्रांचा पुरवठाही थांबवावा लागलाय.
 
रशिया हा जगातील दुसरा सर्वांत मोठा शस्त्रास्त्र निर्यात करणारा देश आहे आणि अनेक दशकांच्या कठोर परिश्रमानंतर त्याने जागतिक शस्त्रास्त्र बाजारात हे स्थान मिळवलंय.
 
पण युक्रेनसोबतच्या युद्धात दारूगोळ्याच्या तुटवड्यामुळे रशियासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय.
 
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, रशियाने शस्त्रास्त्र आणि सुट्या भागांचं उत्पादन वाढवलंय, परंतु त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत.
 
रशियाने आता त्या देशांसोबत संपर्क साधलाय ज्या देशांनी त्यांच्याकडून विमानं, हेलिकॉप्टर्स, क्षेपणास्त्र आणि युद्ध प्रणाली विकत घेतली होती.
 
याच अहवालानुसार, या वर्षी रशियाने पाकिस्तान, बेलारूस आणि ब्राझीलला विकलेल्या लष्करी आणि मालवाहू हेलिकॉप्टर्सची इंजिनं परत घेण्याबाबत बोलणी केलेय.
 
रशियाला पाकिस्तानकडून काय हवंय?
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्हटलंय की, रशियाने पाकिस्तानला किमान चार एमआय-35एम हेलिकॉप्टर्सची इंजिन्स परत करण्यास सांगितलंय.
 
मात्र, रशियाने या संदर्भात त्यांच्याशी कोणताही संपर्क साधला नसल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं.
 
त्याचप्रमाणे रशियाने ब्राझीलकडूनही 12 हेलिकॉप्टर्सची इंजिन्स मागवली होती. ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितलं की, ही मागणी मान्य करण्यात आलेली नाही, कारण युद्धादरम्यान कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला शस्त्रं न पाठवण्याचं ब्राझीलचं धोरण आहे.
 
रशियाचा जवळचा मित्र बेलारूसने सहा एमआय-26 वाहतूक हेलिकॉप्टर्सची इंजिन्स रशियाला परत केली. मात्र, बेलारूसनेही याबाबत अधिकृत उत्तर दिलेलं नाही.
 
भारत आणि अर्मेनियाला शस्त्रास्त्र पुरवठा बंद
युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाच्या शस्त्रास्त्र निर्यात व्यवसायावरही परिणाम झालाय. भारत आणि अर्मेनियाला विकण्यासाठीची शस्त्र रशिया स्वत: वापरतोय.
 
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, अर्मेनियाला कराराच्या तुलनेत खूप कमी बहुउद्देशीय रॉकेट प्रक्षेपण प्रणाली प्राप्त झाल्यात. त्याचप्रमाणे भारताला होणाऱ्या काही वस्तूंची निर्यातही रद्द करण्यात आलीय.
 
यावर्षीच्या जूनमधील सीमाशुल्क मंजुरीच्या आकडेवारीवर आधारित निक्केई आशिया अहवालात असं सूचित करण्यात आलंय की भारत आणि म्यानमारला विकले गेलेले रनगाडे आणि क्षेपणास्त्रांचे काही भाग रशिया परत खरेदी करू शकतं.
 
यापूर्वी असं वृत्त आलेलं की रशियाने भारताला 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचे सुटे भाग आणि एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा पुरवठा थांबवलाय.
 
भारताला शस्त्र पुरवठा करणारा रशिया हा सर्वात मोठा देश आहे. दरम्यान, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, 2017 ते 2022 दरम्यान भारतीय संरक्षण आयातीतील त्यांचा वाटा 62 टक्क्यांवरून 45 टक्क्यांवर घसरलाय.
 
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूटने सांगितलंय की, भारतातात शस्त्रास्त्र उत्पादनात झालेली वाढ आणि युक्रेनच्या आक्रमणामुळे शस्त्रास्त्रांच्या निर्यातीतील अडथळे यांमुळे रशियाकडून होणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यात घट झालेय.
 
रशियाने इजिप्तकडून 100 हून अधिक इंजिनांची मागणी केलेय
वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रशियन अधिकाऱ्यांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल फताह अल-सिसी यांना 100 हून अधिक रशियन हेलिकॉप्टर परत करण्यास सांगितलेलं. इजिप्त 2014 पासून रशियन शस्त्रास्त्रांचा मोठा खरेदीकर्ता आहे.
 
इजिप्तने रशियासोबत हेलिकॉप्टर, लढाऊ विमानं आणि हवाई संरक्षण यंत्रणा खरेदीसाठी सुमारे एक अब्ज डॉलर्सचे करार केलेत.
 
मात्र, अमेरिकेच्या निर्बंधांच्या भीतीने इजिप्तने या वर्षी मार्चमध्ये रशियासोबतच्या अनेक शस्त्रास्त्र खरेदी करारातून माघार घेतली.
 
एका अहवालानुसार, इजिप्तने यापूर्वी रशियाला रॉकेट विकण्याची योजना आखली होती. पण अमेरिकेच्या दबावामुळे इजिप्तला यातूनही माघार घ्यावी लागली. यानंतर रशियाने इजिप्तला विकलेल्या एमआय-17 आणि एमआय-18 हेलिकॉप्टरची इंजिनं परत करण्यास सांगितलंय.
 
त्या बदल्यात इजिप्तची थकबाकी माफ केली जाईल आणि गव्हाचा पुरवठा सुरू ठेवू, असं रशियानं म्हटलंय. इजिप्तने याला नकार दिल्यास रशियाने इजिप्तमधून आपले शस्त्रास्त्र सल्लागार मागे घेण्याची धमकीही दिलेय.
 
वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसाप, इजिप्त सरकारच्या प्रवक्त्या दिया रश्वान यांनी या विषयावर थेट भाष्य केलं नाही आणि इजिप्त "आजूबाजूच्या अनेक धोक्यांमुळे आपल्या सुरक्षेसोबत तडजोड करू शकत नाही”, असंही सांगितलं.
 
असं असलं तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून अहवालात म्हटलंय की इजिप्त डिसेंबरपर्यंत हेलिकॉप्टर्सची इंजिन्स रशियाला परत पाठवू शकतो. पण इजिप्त किती इंजिन्स रशियाला परत पाठवणार हे स्पष्ट झालेलं नाही.