रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 ऑगस्ट 2024 (17:17 IST)

नासाच्या मोहिमेद्वारे अंतराळात जाण्यासाठी सज्ज असलेले शुभांशु शुक्ला कोण आहेत?

subhanshu shukla
शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरू शकतात. शुभांशु शुक्ला भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत. अमेरिकेची नासा (NASA)आणि भारताची इस्रो (ISRO) या जगातील दोन आघाडीच्या अंतराळ संस्थांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झाली आहे.
यावर्षीच ऑक्टोबरनंतर कधीही ते या मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) जाऊ शकतात.
जर या मोहिमेंतर्गत कॅप्टन शुक्ला अंतराळात गेले तर मागील 40 वर्षांमध्ये अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय अंतराळवीर ठरतील.
1984 मध्ये राकेश शर्मा तत्कालीन सोविएत युनियनच्या अंतराळ मोहिमेत अंतराळात गेले होते.
एक्सिओम-4 (Axiom-4) या मोहिमेसाठी इस्रोने (ISRO) शुक्रवारी कॅप्टन शुभांशु शुक्ला (39) यांच्यासह ग्रुप कॅप्टन प्रशांत बालाकृष्णन नायर (48) यांची निवड केली आहे.
 
अर्थात शुक्ला प्राइम अंतराळवीर असतील तर नायर बॅकअप असतील.
 
म्हणजे शुक्ला हेच या अंतराळ मोहिमेत सहभागी होणार आहेत. मात्र जर काही कारणास्तव शुक्ला जाऊ शकले नाहीत तर त्यांच्या जागी नायर यांना पाठवण्यात येईल.
 
या निमित्ताने भारतीय वायुसेनेनं एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर पोस्ट करत कॅप्टन शुक्ला आणि कॅप्टन नायर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
इस्रोनं यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यात म्हटलं आहे, "इस्रो-नासा यांच्या संयुक्त प्रयत्नांचा भाग म्हणून इस्रोच्या मानव अंतराळ उड्डाण केंद्रानं (Human Space Flight Centre) (HSFC) एक्झिओम स्पेस इन्कॉर्पोरेशन (यूएसए) या नासाकडून मान्यता प्राप्त सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर अंतराळ उड्डाण करार (Space Flight Agreement) (SFA) केला आहे.
या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी एक्सिओम-4 ही मोहीम आखण्यात आली आहे. नॅशनल मिशन असाइनमेंट बोर्डनं या मोहिमेसाठी दोन अंतराळवीरांची (Gaganyatris)शिफारस केली आहे. हे अंतराळवीर म्हणजे कॅप्टन शुभांशु शुक्ला (प्राइम) आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालाकृष्णन (बॅकअप).
अंतराळवीरांबरोबरच या अंतराळयानात एक कार्गो आणि इतर साहित्य देखील असणार आहे.
 
आगामी काळात गगनयान ही भारताचं पहिली अंतराळ मोहीम असणार आहे. या मोहिमेत देखील शुक्ला आणि नायर यांचा समावेश असणार आहे.
 
या मोहिमेसाठी भारतीय वायुसेनेच्या चार अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. गगनयान पुढील वर्षी अंतराळात झेपावणार आहे.
 
इस्रोनं म्हटलं आहे की ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन बालाकृष्णन नायर दोघेही पुढील आठ आठवडे मोहिमेशी निगडित प्रशिक्षण घेणार आहेत. अर्थात गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चारही अधिकाऱ्यांना कठोर प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
 
शुभांशुचा समावेश असलेली अंतराळ मोहीम काय आहे?
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला एक्सिओम-4 मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. एक्सिओम स्पेस या खासगी कंपनीची ही चौथी अंतराळ मोहीम आहे.
 
अमेरिकेच्या नासाबरोबर संयुक्तरित्या ही मोहीम सुरू होईल. हे अंतराळयान स्पेस एक्स रॉकेटद्वारे अंतराळ सोडलं जाईल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणाऱ्या अंतराळयानात ग्रुप कॅप्टन शुक्लाबरोबर पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीर सुद्धा असणार आहेत.
मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळेस भारत आणि अमेरिकेत या मोहिमेसंदर्भात करार झाला होता.
 
नासानं एक्सिओम-4 मोहिमेसाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. मात्र त्यांच्या वेबसाईटवर म्हटलं आहे की ही मोहीम ऑक्टोबर 2024 च्या आधी सुरू होऊ शकणार नाही.
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लाविषयी
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला 39 वर्षांचे असून उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत.
 
शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेत फायटर पायलट आहेत. 2006 मध्ये ते भारतीय वायुसेनेत कार्यरत झाले होते. त्यांना 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे.
 
भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुखोई-30 एमकेआय, मिग-21एस, मिग-29एस, जॅग्वार, हॉक्स डोर्नियर्स आणि एन-32 सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुक्लांच्या गाठीशी आहे.
तर प्रशांत बालाकृष्णन नायर यांना एअर फोर्स अकॅडमीमध्ये 'सोर्ड ऑफ ऑनर' हा सन्मान मिळालेला आहे. ते 1998 मध्ये भारतीय वायुसेनेत कार्यरत झाले. ते कॅटेगरी-वन फ्लाईंग इंस्ट्रक्टर आणि टेस्ट पायलट आहेत.
 
नायर यांच्या गाठीशी 3000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी युनायटेड स्टेट्स स्टाफ कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे. त्याचबरोबर ते भारतीय वायुसेनेत सुखोई-30 स्क्वाड्रनचे कमांडर देखील होते.
 
भारताच्या गगनयान मोहिमेआधी शुक्ला आणि नायर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठविण्यामागे खास उद्देश आहे. कारण यामुळे त्यांना अंतराळ मोहिमेचा अनुभव मिळेल आणि त्याचा फायदा भारताच्या गगनयान मोहिमेला होईल.
 
गगनयान मिशन काय आहे?
या मोहिमेसाठी भारतीय वायुसेनेच्या चार वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेत तीन अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवलं जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी ते अंतराळातून परत येतील.
भारताची इस्रो या मोहिमेची जोरदार तयारी करते आहे. त्यासाठी सातत्यानं चाचण्या घेतल्या जात आहेत.
 
मागील वर्षी ऑक्टोबर (2023) मध्ये एक महत्त्वाची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीतून निष्पन्न झालं होतं की रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानंतर अंतराळवीर सुरक्षितपणे बाहेर पडू शकतात.
भारतीय वायुसेनेतून निवडण्यात आलेले चार अधिकारी म्हणजे, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, ग्रुप कॅप्टन प्रशांत बालाकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप.
 
या चारही अधिकाऱ्यांची निवड झाली त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी त्यांच्या गणवेशावर सोनेरी पंखांच्या डिजाइनचा बॅज लावत ते 'भारताचा सन्मान' असल्याचं म्हटलं होतं.
 
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, "ही चार नावं किंवा चार माणसं नाहीत. 140 कोटी आकांक्षांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या शक्ती आहेत. 40 वर्षांनंतर एखादा भारतीय अंतराळात जाणार आहे. ही आपली वेळ आहे, काउंटडाउन सुद्धा आपलं आहे आणि रॉकेटसुद्धा आपलंच आहे."
Published By- Priya Dixit