शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 जुलै 2024 (16:40 IST)

शहीद अधिकाऱ्याच्या जवळचे कुटुंबीय कोण? पत्नी की आई वडील? कॅ.अंशुमानच्या आई वडिलांची काय आहे मागणी?

anshuman
दिवंगत कॅप्टन अंशुमान यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी भारतीय सैन्यातील जवळच्या कुटुंबीयांसंदर्भात (NOK-next of kin) असणाऱ्या नियमात बदल करण्याची मागणी केली आहे.
 
या नियमानुसार भारतीय सैन्यातील सैनिक किंवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत आणि सन्मान (पुरस्कार) दिला जातो.
 
कीर्ती चक्र हा शौर्यासाठी दिला जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे.
 
गेल्या वर्षी जुलै महिन्यात सियाचिनमध्ये आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवताना कॅप्टन अंशुमान यांचा मृत्यू झाला होता.
 
आपलं कर्तव्य बजावताना दाखवलेल्या शौर्य आणि धाडसासाठी कॅप्टन अंशुमान यांना, मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं.
 
पाच जुलैला राष्ट्रपती भवनात दिवंगत कॅप्टन अंशुमान यांची आई मंजू सिंह आणि त्यांची पत्नी स्मृति यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
 
मात्र आता कॅप्टन अंशुमान सिंह यांच्या आई-वडिलांना वाटतं की एनओके (NOK) (next of kin) नियमात बदल करण्यात यावा. जेणेकरुन सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर मिळणारी आर्थिक मदत आणि सन्मान फक्त त्याच्या पत्नीलाच देण्यात येऊ नये तर त्यामध्ये सैनिकाच्या उर्वरित कुटुंबीयांचाही (आई-वडील) समावेश करण्यात यावा.
 
कॅप्टन अंशुमानच्या कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे
कॅप्टन अंशुमान यांचे वडील रवि प्रताप सिंह हे स्वत: सैन्यातून निवृत्त झाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला या गोष्टीचं दु:ख आहे की कीर्ती चक्र आम्हाला आमच्या घरी नेता आलं नाही."
 
त्यांनी सांगितलं की त्यांच्या सुनेनं म्हणजे स्मृतिनं कीर्ती चक्र तिच्याकडे ठेवलं आहे आणि त्यांना ते नीट पाहता देखील आलं नाही.
 
रवि प्रताप सिंह यांनी सैन्याच्या जवळच्या कुटुंबीयांसाठीच्या (NOK)नियमात बदल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "दोन्ही कुटुंबांना प्रतिकूल आणि सामान्य परिस्थितीत मान्य असेल असा एक व्यापक आणि सर्वमान्य नियम बनवण्यात आला पाहिजे. कोणाच्याही अधिकारांवर गदा येता कामा नये."
 
ते म्हणाले, "एनओके नियमात विधायक बदलाची आवश्यकता आहे."
 
कॅप्टन अंशुमान सिंह यांच्या वडिलांनी या नियमात बदल करण्यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी देखील बोलताना, आपलं मत मांडलं आहे.
 
अर्थात कॅप्टन अंशुमान यांच्या आई-वडिलांचं म्हणणं आहे की, त्यांच्या सुनेनं तिच्या अधिकारांपेक्षा जास्त काहीही नेलेलं नाही. ते या अधिकारांमध्ये बदल करण्याची मागणी करत आहेत.
काय आहे एनओके? (NOK)(next of kin)
 
जवळचे कुटुंबीय (NOK)शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीचे पती/पत्नी, जवळचा नातेवाईक, कुटुंबातील सदस्य किंवा कायदेशीर पालक असा होतो.
 
लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) नितिन कोहली यांनी बीबीसीला सांगितलं की सैन्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या सेवेच्या काळात आपलं जवळचं कुटुंबीय कोण आहे याची माहिती द्यावी लागते.
 
ते सांगतात, "सैनिकाचं एनओके म्हणजे जवळचं कुटुंबीय कोण असणार हे सरकार किंवा भारतीय सेना ठरवत नाही. तर त्या व्यक्तीला स्वत:लाच ते ठरवावं लागतं. जर एखाद्या सैनिकाचं लग्न झालेलं नसेल तर सर्वसाधारणपणे त्याच्या आई-वडिलांचं नाव जवळचं कुटुंबीय म्हणून नोंदवलं जातं, तर जर लग्न झालेलं असेल तर तिथे त्याच्या पत्नीचं नाव येतं."
 
नितिन कोहली सांगतात की जर सैनिकाची इच्छा असेल किंवा काही कारण असेल तर त्याला आपलं एनओके बदलता येतं. मात्र फार कमी वेळा असं होतं.
 
सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या आणखी एका लेफ्टनंट जनरल यांनी बीबीसीला सांगितलं की, प्रत्येक सैनिक आपल्या इच्छेनं एनओके ठरवतो.
 
ते सांगतात, "सैनिकाला पार्ट-2 ऑर्डर भरावी लागते. यामध्ये त्याचं जर लग्न झालेलं असेल तर ते रेकॉर्डवर येतं. त्याचं लग्न कधी, कुठे आणि कोणाबरोबर झालं ही माहिती त्याला या फॉर्ममध्ये द्यावी लागते. यासाठी काही कागदपत्रे देखील लागतात."
 
सैनिकानं एनओकेमध्ये कोणाचंच नाव लिहिलं नाही तर यासंदर्भात सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल म्हणतात, "पार्ट-2 भरताना सैनिक जवळच्या कुटुंबीयांची (NOK)माहिती देतो. हा फॉर्म भरताना त्याच्याकडे दोन पर्याय असतात. तो आपल्या पत्नीबरोबरच आई-वडिलांचं नाव देखील एनओकेमध्ये समाविष्ट करू शकतो."
 
ते सांगतात, "अनेक नवीन सैनिकांना एनओकेबद्दल माहिती नसते. अशावेळी एनओकेमध्ये काय माहिती द्यायची, कोणाचं नाव देता येत, याची माहिती युनिटमधील इतर लोक त्यांना देतात."
 
लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) सांगतात, "जर एखाद्या दिवंगत सैनिकाच्या पत्नीनं दुसरं लग्न केलं तर अशा परिस्थितीत कीर्ती चक्र त्याच्या आई-वडिलांना देण्यात येतं."
 
ते पुढे सांगतात की एखाद्या सैनिकाच्या कुटुंबीयांनी एनओके नियमात बदल करण्याची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारगिल युद्धानंतर या प्रकारची अनेक प्रकरणं समोर आली होती.
 
तर निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी म्हणतात, सेवेच्या काळात कोणताही अॅडजुटेंट जनरल ब्रॅंचच्या माध्यमातून आपलं इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र (विल) तयार करू शकतो. यामध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचं वाटप कोणत्या आधारे करण्यात यावं किंवा कसं करण्यात यावं, या बाबी तो ठरवू शकतो.
 
(सैन्यातील अॅडज्युटेंट जनरल कार्यालय सैन्यातील अनेक गोष्टी हाताळतं. यात मनुष्यबळाचं नियोजन, नियम, धोरणं, भरती, बेपत्ता झालेले सैनिक, सैनिकांच्या सेवेशी निगडीत समस्या इत्यादी विविध बाबी हाताळल्या जातात.)
 
राज्य स्तरावर नियमात बदल
सेवेत असताना सैनिकाचा मृत्यू झाल्यास अनेकदा राज्य सरकारंसुद्धा आर्थिक मदत करतात.
 
एनओकेच्या नियमात बदल करण्याची मागणी करणारी अनेक प्रकरणे लक्षात घेऊन अनेक राज्य सरकारांनी आपल्या नियमात बदल केला आहे.
 
यासंदर्भात मध्य प्रदेश सरकारनं अलीकडेच एक निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार जर एखादा सैनिक 'शहीद' झाला तर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची त्याची पत्नी आणि त्याच्या आई-वडिलांमध्ये समसमान विभागणी केली जाईल.
 
तर 2020 मध्ये उत्तर प्रदेश सरकारनं निर्णय घेतला होता की जर राज्यातील एखादा सैनिक शहीद झाला तर त्याला 25 लाख रुपयांऐवजी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
 
या निर्णयानुसार 50 लाख रुपयांपैकी 35 लाख रुपये पत्नीला आणि 15 लाख रुपये शहीद सैनिकाच्या आई-वडिलांना दिले जातील.
 
कॅप्टन अंशुमान सिंह च्या वडिलांनी देखील सांगितलं की या नियमांतर्गत त्यांना राज्य सरकारकडून 15 लाख रुपये मिळाले आहेत.
 
याशिवाय हरियाणा सरकारनं देखील 2017 मध्ये पत्नीला 100 टक्के आर्थिक मदत मिळण्याच्या नियमात बदल केला होता. आता 30 टक्के रक्कम 'शहीदा'च्या आई-वडिलांना आणि 70 टक्के रक्कम त्याच्या पत्नी आणि मुलांना दिली जाते.
 
कॅप्टन अंशुमान यांचा विवाह
19 जुलै 2023 च्या सकाळी सियाचिन ग्लेशियरवर भारतीय सैन्याच्या अनेक तंबूंमध्ये आग लागली होती. या आगीत अनेक जवान अडकले होते.
 
त्यावेळेस आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता कॅप्टन अंशुमान पुढे सरसावले. त्यांनी 5 जवानांचा जीव वाचवला. मात्र या प्रयत्नांमध्ये ते स्वत: आगीत होरपळून निघाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
 
या दुर्घटनेच्या पाच महिने आधी 10 फेब्रुवारीला त्याचं लग्नं स्मृति यांच्याशी झालं होतं. स्मृति इंजिनीअर आहेत.
 
स्मृति यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये त्यांची अंशुमानशी भेट झाली होती. त्यानंतर पुण्यातील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये त्यांची निवड झाली होती.
 
इथूनच मेडिकलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय सैन्यात मेडिकल कोअर मध्ये रुजू झाले होते. स्मृति सांगतात की एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अंशुमान पुण्याहून गुरदासपूरला आले होते.
 
अंशुमान यांनी आठवण करताना स्मृति सांगतात, "आम्ही कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटलो होतो. मला नाट्यमय पद्धतीनं सांगायचं नाही मात्र पहिल्याच भेटीत आम्ही प्रेमात पडलो होतो...एका महिन्याच्या गाठीभेटीनंतर आम्ही आठ वर्षे लाँग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये होतो. मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवानं आमच्या लग्नानंतर दोन महिन्याच्या आतच त्यांची पोस्टिंग सियाचिनमध्ये झाली."
 
स्मृति म्हणतात, "ते मला सांगायचे की माझी आठवण कोणालाच येणार नाही, असा सर्वसामान्य मृत्यू मला येणार नाही. मी माझ्या छातीवर मेडल घेऊन मरेन आणि लोक मला लक्षात ठेवतील."