शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (14:52 IST)

सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार का?

sonia gandhi
डिसेंबर 2017 मध्ये घडलेला हा किस्सा. त्यावेळी राहुल गांधींना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी बसविण्यात येणार होतं.पण अध्यक्षपदावर बसण्याच्या एक दिवस आधी काही पत्रकारांनी संसद भवनाबाहेर सोनिया गांधींना गाठलं आणि विचारलं की, आता राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले तर इथून पुढे तुमची भूमिका काय असेल?यावर सोनिया गांधी म्हणाल्या- "मी निवृत्ती घेत आहे."आणि आज पुन्हा पाच वर्षांनंतर सोनिया गांधींची 'निवृत्ती' चर्चेत आली आहे.
 
शनिवारी रायपूरमध्ये पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या 85 व्या अधिवेशनात माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, 1998 मध्ये मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या 25 वर्षात पक्षाने मोठं यश मिळवलं तर काही ठिकाणी पक्षाची निराशाही झाली.
 
सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, 2004, 2009 मध्ये पक्षाने मिळवलेलं यश आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेल्या सक्षम नेतृत्वामुळे मी समाधानी आहे. पण माझ्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे 'भारत जोडो यात्रे'सोबतच माझ्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ सुद्धा संपला आहे. आणि इथून पुढचा काळ काँग्रेससाठी टर्निंग पॉइंट ठरेल.
 
या अधिवेशनात सोनिया गांधींच्या भाषणाव्यतिरिक्त त्यांच्या कार्यकाळाशी संबंधित एक डॉक्युमेंट्री देखील दाखवण्यात आली.
 
शनिवारी झालेल्या अधिवेशनात सोनिया गांधींनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेले नाहीत हे देखील तितकंच खरं आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष या भूमिकेतून भारत जोडो यात्रेला जोडून आपली घोषणा केली.
 
मात्र अधिवेशनातील त्यांच्या भाषणाची चर्चा रायपूरपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे.
रायपूरचे ज्येष्ठ पत्रकार सुनील कुमार सांगतात की, "एका बाजूला सोनिया गांधी पक्षाचं अध्यक्षपद सोडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मल्लिकार्जुन खरगे पक्षाचे नवे अध्यक्ष बनले आहेत. या सगळ्यात सोनिया गांधींनी राजकीय निवृत्ती घेतली आहे हे काँग्रेसच्या लोकांनी मान्य केलंच पाहिजे. त्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सन्मानपूर्वक निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचं आजचं भाषण म्हणजे आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याची घोषणा आहे'
 
यावर्षी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत, तर पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. आणि अशातच सोनिया गांधींनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
 
त्यामुळे येत्या काळात त्यांची भूमिका काय असेल याबाबत चर्चा सुरू होणे स्वाभाविक आहे.
 
सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाच्या इतिहासात सर्वात प्रदीर्घ काळ म्हणजे जवळपास 19 वर्ष काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलंय. 2004 मध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यावर पंतप्रधानपदासाठी त्यांनी स्वतःऐवजी मनमोहन सिंग यांचं नाव पुढे केलं. पक्षाने घेतलेले निर्णय सरकारमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांच्या सरकारने घेतलेले आजही ऐतिहासिक मानले जातात.
 
त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात रोजगार हमी योजना, अन्नाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार असे निर्णय घेतले गेले. त्यामुळे भारतीय राजकारणाला नवी दिशा मिळाली.
 
तसेच त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात देशात पहिल्यांदाच महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभादेवी पाटील यांनी शपथ घेतली. आणि लोकसभेच्या अध्यक्षपदी पहिल्या दलित महिला अध्यक्षा मीरा कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांच्या कार्यकाळातच महिला आरक्षण विधेयक
वयवर्ष 76 असलेल्या सोनिया गांधी त्यांच्या तब्येतीमुळे, वयोमानामुळे पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय दिसत नाहीत. मात्र, या अधिवेशनात झालेल्या त्यांच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात काही चर्चा सुरू झाल्या आहेत. जसं की, वृध्दत्वाकडे झुकलेल्या सोनिया गांधी पक्षाला आपल्या सावलीतून मुक्त करू इच्छित आहेत. तर यातून वृध्दत्वाकडे झुकलेल्या काही काँग्रसी नेत्यांनाही त्यांनी संकेत दिले आहेत.
 
छत्तीसगडमध्ये शनिवारी पार पडलेल्या महाअधिवेशनात काँग्रेसने आपल्या संविधानात मोठी दुरुस्ती केली. काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांमधील 50 टक्के पदं आरक्षणातून भरली जातील, असा निर्णय पक्षाने घेतलाय.
 
काँग्रेस पक्षाने एससी-एसटी, ओबीसी, महिला आणि तरुणांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय आणि पक्षात 50 वर्षांखालील तरुण आणि महिलांचा सहभाग वाढवला जाईल.
 
राजकीय तज्ञांच्या मते, राहुल गांधींनी नेहमीच 'युवा काँग्रेस'ची घोषणा केली आहे. सोनिया गांधींनी निवृत्ती स्वीकारत या घोषणेची अंमलबजावणी केल्याचं दिसतं.
 
काही काँग्रेस नेत्यांना वाटतं की, सोनिया गांधींचं हल्लीचं वक्तव्य त्या सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचे संकेत वाटतात.
काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांच्यामते, सोनिया गांधींनी 'सक्रिय राजकारण'पासून वेगळे होण्याचे संकेत दिले आहेत.
 
संदीप दीक्षित म्हणाले, "संघटनेच्या जबाबदाऱ्या आणि पक्षाच्या दैनंदिन कामापासून अलिप्त राहण्यासंदर्भात त्या म्हणाल्या आहेत. पण ऐक्य आणि पक्षातील प्रश्न सोडवणे ही कोणत्याही अनुभवी नेत्याची दुसरी भूमिका असते. त्यामुळे कदाचित त्या या कामात सक्रिय होतील असं काँग्रेसच्या लोकांना वाटतं."
 
निवृत्तीस नकार..
दुसरीकडे, काँग्रेस पक्षातील इतर अनेक नेत्यांना वाटतं की, सोनिया गांधींच्या भाषणाचा आणि त्यांच्या राजकीय निवृत्तीचा संबंध जोडणं योग्य नाही.
 
सोनिया गांधी सक्रिय राजकारणातून बाहेर पडल्या आहेत ही गोष्ट काँग्रेस नेते अखिलेश प्रताप सिंग पूर्णपणे नाकारतात.
 
अखिलेश प्रताप सिंह सांगतात की, "आज पक्षाच्या संविधानात एक दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आमच्या काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष किंवा माजी पंतप्रधान वर्किंग कमिटीमध्ये असतील. सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष होत्या, त्यामुळे त्या सुद्धा या कमिटीत असतील. त्यामुळे त्या राजकारणातून निवृत्त होणार आहेत या चर्चा फोल आहेत. त्यांनी आपल्या भाषणात केवळ अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याची घोषणा केली आहे."
काँग्रेस नेत्या आणि छत्तीसगडच्या प्रभारी कुमारी शैलजा सुद्धा सोनिया गांधींच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चा फोल असल्याचं म्हणतात.
 
पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, "तुम्ही याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. सोनिया गांधी आमच्या अध्यक्षा होत्या, आज पक्षाला नवे अध्यक्ष मिळाले आहेत. सोनिया गांधींनी आपल्या कार्यकाळाविषयी सांगितलं आहे. आम्हाला सोनिया गांधींचं मार्गदर्शन हवंय हे नव्या अध्यक्षांनीही सांगितलंय. त्यामुळे त्याचा विपर्यास होऊ नये असं मला वाटतं."
 
सोनिया गांधींच्या भाषणाचा राजकीय अर्थ काहीही असो, पण शनिवारच्या भाषणानंतर आता त्यांची भूमिका बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
भारताच्या राजकारणात निवृत्तीची परंपरा नाहीये. त्यामुळे काँग्रेस आणि भारतीय राजकारणात सोनिया गांधींची भूमिका नेमकी काय असणार हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.
Published By- Priya Dixit